माऊंट बेरी पॉईंट भागात टॅक्सी उभ्या करा: नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी

छोट्या वाहनतळामुळे कोंडी रोखण्यास मदत

| माथेरान | प्रतिनिधी |

माथेरान या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना येथील दस्तुरी नाका या ठिकाणी गाड्या उभ्या करून माथेरानमध्ये पायी मार्गक्रमण करावे लागते. मात्र, दस्तुरी नाक या ठिकाणी येथील टॅक्सी संघटनेच्या गाड्या देखील मोठ्या प्रमाणात उभ्या असतात. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी दस्तुरी नाका येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहने उभी करण्यासाठी मोठी तारांबळ उडते. यावर उपाय म्हणून नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी टॅक्सी संघटनेच्या गाड्यांना माऊंट बेरी पॉईंट्स येथील जागेत उभ्या करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे वाहतुक कोंडी रोखण्यास मोठी मदत होणार आहे.

माथेरान हे मुंबई-पुण्यापासून अगदी जवळचे पर्यटनस्थळ असल्यामुळे या ठिकाणी बाराही महिने पर्यटकांची गर्दी असते. येथील दस्तुरी नाक्यावरील प्रवासी कर आकारणी समोरील गायमुख भागात पर्यटकांना आपली वाहने उभी करून माथेरान शहरात पायी चालत जावे लागते. मात्र, या ठिकाणी टॅक्सी संघटनेच्या देखील गाड्या उभ्या असतात. दरम्यान, या ठिकाणी ऐन गर्दीच्या वेळी एकेरी वाहतूकीमुळे खासगी वाहनांची अक्षरशः कोंडी होत असते. याकामी नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी दस्तुरी पार्किंगच्या बाजूला असणाऱ्या माऊंट बेरी पॉईंट्स येथील जागेत टॅक्सी संघटनेच्या गाड्या उभ्या करण्यात याव्यात, जेणेकरून सुट्ट्यांच्या हंगामात वाहतूक कोंडी होणार नाही, असे सुचविले होते. त्याप्रमाणे माऊंट बेरी परिसरातील मोकळ्या जागेत टॅक्सी चालक आपल्या गाड्या उभ्या करत आहेत. त्यामुळे काहीअंशी वाहतूक सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे. टॅक्सी चालक मालक संघटनेच्या सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे हे सहज शक्य होणार आहे.

दरम्यान, माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांचा आरामदायी प्रवास व्हावा, त्यांना कोणत्याही परिस्थितीत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी चंद्रकांत चौधरी यांनी माऊंट बेरी भागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत नगरसेवक केतन रामाणे, सामाजिक कार्यकर्ते निखिल शिंदे, दिलीप सकपाळ, शाकिर मुजावर आणि अन्य नागरिक उपस्थित होते.

माऊंट बेरी या ठिकाणी टॅक्सी संघटनेच्या सदस्यांनी काही प्रमाणात गाड्या पार्क केल्या आहेत. याच भागातील मार्गात जे काही दगडगोटे आहेत ते काढून त्याजागी पेव्हर ब्लॉक लावून व्यवस्थितपणे जागा उपलब्ध करून दिल्यास टॅक्सी चालकांना सोयीचे होणार आहे.

चंद्रकांत चौधरी,
नगराध्यक्ष, माथेरान नगरपरिषद


Exit mobile version