प्रतिबंधासाठी असलेली अग्निशमन यंत्रणा बंद
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
छतावर वाहनतळ असलेले राज्यातील एकमेव रेल्वेस्थानक असलेल्या खारघरच्या वाहनतळामध्ये जवळपास चारशे चारचाकी, तर तीन हजार दुचाकी वाहने उभी केली जात आहेत. या वाहनांच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधित उपाय म्हणून छतावर अग्निशमन यंत्रणा बसवली आहे. मात्र, अनेक वर्षांपासून ती बंद असल्याने स्थानकाची सुरक्षा धोक्यात आली आहे.
खारघर रेल्वेस्थानकाच्या छतावर सिडकोने उभारलेली अग्निशमन यंत्रणा अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे आगीची दुर्घटना घडल्यास मोठी हानी होण्याचा धोका आहे. अशातच काही दिवसांपूर्वी मानसरोवर रेल्वेस्थानकाजवळील दुचाकींना आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेत 42 दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. त्यामुळे अशा प्रकारची घटना खारघर स्थानकावर घडण्याची शक्यता असल्याने बंद असलेली अग्निशमन यंत्रणा सिडकोने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. याविषयी सिडकोच्या अग्निशमन विभागात विचारणा केली असता, वाशी, बेलापूर रेल्वेस्थानक वगळता ऐरोली ते पनवेलदरम्यान सर्व स्थानकांत अग्निशमन यंत्रणा बसवण्याबाबतचा अहवाल अभियांत्रिकी आणि सिडकोच्या रेल्वे विभागाकडे सादर करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
रात्रीच्या वेळी मद्यपींचा वावर
खारघर रेल्वेस्थानक परिसरात बिअर आणि दारूच्या बाटल्या, सिगारेट आणि माचीस असल्याचे आढळून आले. त्यामुळे रात्रीच्या वेळी काही वाहनचालक येथे मद्यप्राशन करत असल्याचा प्रत्यय येत आहे. विशेष म्हणजे, वाहनतळाच्या प्रवेशद्वारावरील सर्व पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
पत्रव्यवहार करूनही सिडकोचे दुर्लक्ष
नोव्हेंबर महिन्यात मानसरोवर रेल्वेस्थानकाजवळील दुचाकींना आग लागली होती. या आगीत गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ही घटना घडताच खारघर रेल्वेस्थानकावर वाहनतळाच्या कामकाज पाहणार्या एजन्सीने सिडकोकडे पत्रव्यवहार करून बंद असलेली अग्निशमन यंत्रणा सुरू करावी, असे पत्र पाठविले होते. मात्र, अद्याप त्या अनुषंगाने सिडकोने काहीही उपाययोजना केलेली नाही.
प्रवीण शेवतकर
खारघर रेल्वेस्थानकाच्या छतावरील अग्निशमन यंत्रणेविषयी कनिष्ठ अभियंत्यांकडून माहिती घेऊन पुढील प्रक्रिया केली जाईल.
अधिकारी रेल्वे विभाग, सिडको