| कर्जत | वार्ताहर |
जलजीवन मिशन अंतर्गत पोशीर ग्रामपंचायतीत सुरू असलेल्या कामाबाबत ग्रामस्थांनी हरकत घेतली आहे. मंजूर अंदाजपत्रकानुसार कामाची अंमलबजावणी होत नसल्याने हे काम थांबवण्यात यावे, तसेच कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी अभियंता लघुपाटबंधारे विभाग यांच्याकडे केली आहे.
पोशीर व चिकणपाडा या गावांकरिता जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. योजनेबद्दल 11 मे रोजी योगेश राणे व इतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज करून कामाबाबत ग्रामसभेत माहिती द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र पोशीर ग्रामपंचायतीकडून योग्य माहिती देण्यात आली नाही.
योजनेसाठी तब्बल 1 कोटी 7 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र आराखड्यानुसार काम केले जात नसून वापरले जाणारे साहित्यही निकृष्ट दर्जाचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. योजनेत मंजूर अंदाजपत्रकानुसार 11,182 मीटर इतक्या लांबीची जलवाहिनी असून, ती बिरदोले येथील पंपसेटवरून आणावयाची आहे. तसेच 1,400 लिटर इतक्या क्षमतेची पाण्याची टाकी, ट्रेंच गॅलरी इ. चा यात समावेश असून, प्रत्यक्षात काम होताना दिसत नाही. मंजूर अंदाजपत्रकाऐवजी टाकण्यात येणारी वाहिनी कमी दर्जाची आहे. पाईप जोडण्यासाठी वापरण्यात येणारी पद्धतही चुकीची व तकलादू आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या कामात ग्रामपंचायतीचे सदस्यच पोटठेकेदार असल्याने माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
मंजूर अंदाजपत्रकाप्रमाणे प्रत्यक्षात काम होत नसून पाणी योजनेचे काम थांबविण्यात यावे व सदर कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
त्रुटींकडे दुर्लक्ष
गावांकरिता जलजीवन मिशन योजनेच्या तांत्रिक बाबींबाबत ग्रामस्थांना शंका आहे. याप्रकरणी विशेष ग्रामसभा आयोजित करून संबंधित विभागाचे उपअभियंत्यांनी कामाची माहिती द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. गावातील नागरिक योगेश राणे यांनी जलजीवन योजनेतील काही त्रुटी ग्रामसभेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करून काम सुरूच ठेवण्यात आले आहे.
जलजीवन मिशन योजनेतील मंजूर अंदाजपत्रकानुसार काम सुरू नसून त्यात अनेक त्रुटी आहेत. योजनेसाठी तब्बल 1 कोटी 7 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, त्याचा योग्य वापर करून दर्जेदार काम व्हायला हवे.
धोंडू राणे, माजी सभापती
कर्जत