मुरुडमध्ये शेकापच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्ष हा तळागाळातील घटकांचा विचार करणारा पक्ष आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगारांचा आवाज असणारा पक्ष आजही घराघरात पोहोचला आहे. सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत शेतकरी कामगार पक्ष खंबीरपणे उभा आहे. सत्तेसाठी पक्षाने काम केले नाही, मात्र गोरगरीबांना केंद्रबिंदू ठेवून काम केले आहे. 79 वर्षांत पक्षाने सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या दोन ऑगस्ट रोजी पक्षाचा वर्धापन दिन खालापूरमध्ये होणार आहे. हा सोहळा जल्लोषात साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी केले.
शेतकरी कामगार पक्षाचा 79 वा वर्धापन दिन सोहळा यावर्षी खालापूरमध्ये होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुरूडमध्ये आयोजित बैठकीत खैरे बोलत होते. यावेळी शेकाप राज्य कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक, मुरूड तालुका चिटणीस विजय गिदी, प्रमोद घासे, तुकाराम पाटील, चंद्रकांत कमाने, मनोहर बैले, सोनाली कासार, नंदा पाटील, अरुण मढवी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
रविवारी (दि.2) ऑगस्ट रोजी पक्षाचा वर्धापन दिन यशस्वीपणे साजरा करण्यासाठी तालुकास्तरीय आढावा बैठक मूरूडमधील उसरोली येथील आगरी समाज हॉल येथे घेण्यात आली. यावेळी सुरेश खैरे यांच्यासह प्रदीप नाईक आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची माहिती दिली. वर्धापन दिन म्हणजे सर्व कार्यकर्त्यांसाठी उत्सव आहे. या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. शेतकरी कामगार पक्षाने शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित, भूमीपूत्र तसेच विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांवर आवाज उठविला आहे. जनसामान्यांसाठी लढणारा पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाकडे पाहिले जाते. शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी कायमच या भागातील प्रश्न मार्गी लावले आहेत. अन्यायविरोधात त्यांनी खंबीरपणे लढा दिला आहे. अनेक ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवून प्रशासनानाला जागे करण्याचे काम त्यांनी केले आहे. शाहू, फुले, आंबेडकर विचारांचा वारसा लाभलेल्या शेकापसाठी आगामी काळ चांगला आहे. पुढे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास सुरेश खैरे यांनी व्यक्त केला. दरम्यान, त्यांनी वर्धापन दिनाला मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन केले.







