प्रवाशांचा विमा शासकीय खर्चाने काढावा: जयवंत दरेकर

| रसायनी | वार्ताहर |

मुंबई-गोवा महामार्गाचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत शासकीय खर्चाने प्रवाशांचा विमा काढावा, अशी मागणी कोकण विकास समिती अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी केली आहे. त्याबाबत केंद्रिय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या दीड दशकाहून अधिक काळ सुरु आहे. पळस्पे, इंदापूर विभाग, चिपळूण, आरवली, संगमेश्वर, हातखंबा अशा कित्येक भागातील रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून बिकट अवस्थेत आहे. इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण रस्त्यांचे व पळस्पे, इंदापूर, लोणेरे, चिपळूण या ठिकाणचे पूल अशा कित्येक ठिकाणी कामच अद्याप सुरु न झाल्यामुळे तेथे कित्येक तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. पेण, नागोठणे, सुकेळी येथील रस्त्यांची चाळण झाली आहे. काही भागांत चांगला रस्ता असला तरी पावसाळ्यात निर्णाण होणारे खड्डे व चिखल मातीतून वाहनचालकांना गाडी चालवावी लागते. त्यामुळे गाडी आपटून टायर फुटणे, गाडीचे काही महत्वाचे भाग तुटणे, गाडी रस्त्यात बंद पडणे असे प्रकार हमखास घडत आहेत. त्यामुळे सर्वांना या मार्गावरून प्रवास करून झाल्यावर गाडीच्या देखभाल दुरुस्तीचा मोठा खर्च सहन करावा लागतो. तसेच, हजारो नागरिकांना अपघाती मरण आले तर काहींना कायमचे अपंगत्व आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना गाडीची नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक फेरीला नुकसान रक्कम द्यावी, अपघात होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे सर्व प्रवाशांना किमान 1 कोटी जीवन विमा व अपघात झाल्यास वैद्यकीय उपचारांसाठी किमान 50 लाखांचा विमा शासनाने स्वखर्चातून करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Exit mobile version