प्रशासनाकडून प्रवाशांची थट्टा

स्थानक प्रबंधकावर कारवाईची मागणी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत रेल्वे स्थानकात वयोवृद्ध महिला पुरुष प्रवाशांना तत्काळ पोहचण्यासाठी रेल्वे स्थानकात कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीत. त्यामुळे अशा प्रवाशांना प्रसंगी जीव धोक्यात घालून स्थानकात ये-जा करावी लागत आहे. त्यात सहा एप्रिल रोजी कोणतीही उद्घोषणा न होता हैद्राबाद एक्स्प्रेस गाडी ही फलाट दोनवर नेण्यात आली. त्याबद्दल कर्जत पॅसेंजर असोसिएशनकडून स्थानक प्रबंधकांना सूचना केली असता त्यांच्याकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पॅसेंजर असोसिएशनकडून कर्जत रेल्वे स्थानक प्रबंधक प्रभाष कुमार लाल यांचे बेजबाबदार कारभार बद्दल कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

शनिवार (दि.6) 22732 हैद्राबाद सुपरफास्ट एक्स्प्रेस कर्जत रेल्वे स्थानकात सायंकाळी चार दरम्यान एक नंबर फलाटाऐवजी दोन नंबर वरील फलाटावर आणण्यात आली. परंतु, त्याबाबत कोणतीही उद्घोषणा कर्जत रेल्वे स्थानकात केली नाही. त्यामुळे फलाट क्रमांक एकवर हैदराबाद एक्स्प्रेसची वाट पाहणार्‍या वयोवृद्ध महिला प्रवाशांना अक्षरशः धावपळ झाली. त्यात कोणत्याही प्रकारची उद्घोषणा न होता हैद्राबाद गाडी फलाट दोनवर आल्याने फलाट क्रमांक एकवर उभ्या असलेल्या प्रवधांची धावपळ सुरू झाली. हैदराबाद एक्स्प्रेसची वयोवृद्ध महिला पुरुष यांच्यासोबत सामानाच्या बॅगा घेऊन वाट पाहत असलेल्या कुटुंबाची फलाट क्रमांक दोनवर गाडी आल्यानंतर धावपळ झाली. नाईलाजास्तव त्यांना जीव धोक्यात घालून रुळ ओलांडुन फलाट क्रमांक दोनवर यावे लागले. वॉकरचा उपयोग केल्याशिवाय चालता येत नसलेल्या वयोवृद्ध महिला पुरुष प्रवाशांना खुपच हाल अपेष्टा सहन करत, दोन प्रवासी व्यक्तींना पकडुन रेल्वेरुळ ओलांडून फलाट क्रमांक दोनवर आणले. फलाट क्रमांक दोनवर आल्यानंतरही त्यांना गाडी सुटण्याची वेळ झाल्यामुळे अक्षरशः वयोवृद्ध महिलेला एका प्रवाशाने आपल्या पाठीवर घेऊन धावतपळत फरफटत अपंगांच्या डब्यात कसेबसे चढवले. कर्जत रेल्वे स्थानकामध्ये अपंग, वयोवृद्ध, आजारी रुग्णांसाठी कोणतीही सुविधा नाही, शिवाय सोई सुविधा उपलब्ध न करता बेजबाबदारपणे फक्त वेतनासाठी काम करणार्‍या स्टेशन मास्तरांची लवकरात लवकर हकालपट्टी करण्याची मागणी देखील असोसिएशन करणार आहे.

Exit mobile version