गळक्या बसमध्ये प्रवाशांनी केला प्रवास

। कोर्लई । वार्ताहर ।
पावसाळा सुरू होऊन महिना होतो न होतो तोच मुरुड आगारातील गळक्या गाड्या प्रवाशांची डोकेदुखी ठरत असून नुकताच मुरुड ते स्वारगेट असा गळक्या एसटी बसमधून भिजत प्रवास करावा लागल्याने प्रवासीवर्गातून नाराजीचा सूर दिसून आला.

मुरुड बस आगारातून सकाळी सात वाजता सुटलेल्या मुरुड-स्वारगेट बस क्र.एम.एच 14 बी टी.2670 या गाडीतील प्रवाशांना अक्षरशः पाण्यातून प्रवास करण्याची वेळ आली. सदर बस ही गळकी असून तिच्या वरील छतातून तर पावसाचे पाणी टपकत होतेच शिवाय बसच्या फ्लोअरींग पत्र्याच्या जोडणीतून खड्ड्यातील पाण्याचा अभिषेक प्रवाशांवर होत होता. त्यामुळे पुण्यापर्यंतचा प्रवास भिजत करावा लागला. दरम्यान, पावसाळ्यात लांब पल्ल्याच्या गाड्या सुस्थितीतील सोडण्यात याव्यात अशी मागणी प्रवासी वर्गातून जोर धरीत आहे.

Exit mobile version