पेशवाई रस्त्याला अखेरची घर घर

गावातील अंतर्गत रस्त्यासारखी अवस्था

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत-कल्याण राज्यमार्ग वाहतुकीस बंद असेल तर नेरळमधील वाहनांसाठी पर्यायी रस्ता म्हणून नेरळ-माणगाव असा पेशवाई रस्ता ओळखला जातो. मात्र, हा रस्ता ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यासारखा खड्ड्यात हरवलेला आहे. अवजड वाहनांची वाहतूक या रस्त्याने मागील काही वर्षे होत होती आणि त्यामुळे रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. दरम्यान, त्या रस्त्याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

मुरबाड-कर्जत रस्त्याने नेरळ येण्यासाठी कळंब रस्ता पुढे नेरळ येथून कर्जतकडे जातो. तसेच कल्याण-कर्जत रस्तादेखील नेरळ गावातून जातो. या दोन्ही राज्यमार्ग रस्त्यांवर नेरळ येथे काही अडचणी असतील, तर व्हॅनचालक यांच्यासाठी कर्जत जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून पेशवाई रस्ता पर्याय आहे. मात्र, बोर्ले येथून आंबिवली रेल्वे फाटक असा निघणारा रस्ता अवजड वाहनांच्या सततच्या वर्दळीमळे नादुरुस्त झाला आहे. त्या रस्त्याकडे पाहायला सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना वेळ नाही. त्यामुळे अवघा दोन किलोमीटर लांबीचा हा रस्ता अखेरच्या घटका मोजत आहे. पर्यायी रस्ता म्हणून आणि आपत्कालीन मार्ग म्हणून नेरळ गावाला वळसा घालून जाणारा पेशवाई रस्ता शासनाने आरसीसी काँक्रीटचा बनविण्याची गरज आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांत शासनाच्या कोणत्याही यंत्रणेकडून रस्त्याच्या कामासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद केली गेलेली नाही. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस फार कमी प्रमाणात वापरला जात आहे.

मात्र, यावर्षी मध्य रेल्वेच्या नेरळ फाटक येथील दुरुस्तीच्या कामामुळे नेरळमधील फाटकातून ये-जा करणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सात दिवस वाहतूक बंद असताना वाहन चालक यांच्याकडून नाईलाज म्हणून पेशवाई रस्त्याचा वापर कर्जत येथे जाण्यासाठी आणि नेरळ भागात पोहोचण्यासाठी करीत होते. मात्र, त्या रस्त्याने वाहतूक करताना वाहनचालकांना आपण एखाद्या ग्रामीण भागातील रस्त्याने प्रवास करीत असल्याचा अनुभव घेत होते. त्यामुळे एकदा शासनाच्या अधिकार्‍यांनी या रस्त्याने प्रवास करून पाहावा आणि मग रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम हाती घ्यावे, अशी मागणी संतप्त वाहनचालक करीत आहेत.

Exit mobile version