आता वहीमध्ये सरस्वती काढून पूजन
| अलिबाग | प्रतिनिधी |
आता ऑनलाईन शिक्षणाच्या जगतामध्ये मोबाईल अथवा, वहीवर लिखाण करून शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे प्लास्टीक व लाकडाची पाटी कालबाह्य झाली आहे. या पाटीची जागा आता वहीने घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यात गुरुवारी (दि.2) दसऱ्यानिमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी वहीवर सरस्वतीचे चित्र काढून वही पूजन केले.
पूर्वी पाटीवर लिहण्याची सवय होती. जिल्हा परिषदसह अन्य शाळांमधील विद्यार्थी पाटीवर अभ्यास तसेच लिखाण करीत होते. त्यावेळी पाचवीपर्यंत पाटीवर अभ्यास केला जात होता. पाचवीनंतर वहीवर अभ्यास करण्याची पद्धत होती. परंतु, बदलत्या काळानुसार शिकविण्याची पद्धत बदलण्यात आली. पाटीच्या जागी वही अथवा मोबाईलद्वारे शिक्षण देण्याकडे भर देण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन शिक्षणावर अधिक भर दिला जात आहे. परंतु, वहीमध्ये घरचा अभ्यास लिहून आणण्याचे काम विद्यार्थ्यांना दिले जाते. त्यामुळे काळ्या रंगाची पाटी दिवसेंदिवस दप्तरातून कालबाह्य झाल्याचे चित्र आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुरुवारी (दि.2) दसऱ्या निमित्त सरस्वती पूजन करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी वहीवर सरस्वतीचे चित्र काढले. ती वही घेऊन सकाळी विद्यार्थी शाळेत आले. एका हातामध्ये वही तर दुसऱ्या हातामध्ये रुमालामधून थोडे तांदूळ, अबीर, गुलाल, फुले, पेन्सील, पेन, अगरबत्ती घेऊन विद्यार्थी शाळेत आले. शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना रांगेत बसवून वहीची पूजा करण्यास सांगितले. त्यानुसार फुले, गुलाल, अर्पण करून पूजा करण्यात आली. यावेळी मोबाईलच्या युगात रमणाऱ्या शाळकरी मुलांना एक वेगळा आनंद मिळाला. विद्यार्थ्यांनी वहीवर सरस्वतीचे चित्र काढून वहीचे पुजन केले. त्यामुळे पाटीची जागा आता वहीने घेतल्याने पाटी कालबाह्य होऊ लागली आहे. मात्र, जिल्ह्यातील काही शाळांमध्ये वही ऐवजी पाटीपूजनच करण्यात आले.
पुर्वी दसऱ्याला पाटी पूजन केले जात होते. आता मात्र पाटीचा वापर कमी झाला असून, वहीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे अलीकडे दसऱ्याला पाटी पुजनाऐवजी वही पुजन केले जाते. वहीवर सरस्वतीचे चित्र काढून फुले अर्पण करून अबीर गुलाल लावला जातो. तसेच, अगरबत्ती लावून पुजन केले जाते.
रमेश धुमाळ,
मुख्याध्यापक, राजेवाडी-अलिबाग







