। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत मधील गावंडवाडी येथील 45 वर्षीय व्यक्तीचा कशेळे येथील ग्रामीण रुग्णालयात वेळेवर उपचार झाला नसल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. तुकाराम गिरजू गावंडा असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तुकाराम यांच्यावर उपचार करताना वेळकाढूपणा दाखवल्याने या रुग्णाचा मृत्यू झाला असून डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबद्दल त्यांच्या नातेवाईकांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
खांडस येथील गावंडवाडीत राहणारे तुकाराम गावंडा हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.त्यांच्या मागे पत्नी, 17 वर्षांचा मुलगा, विवाहित मुलगी आणि वृद्ध आई असा परिवार आहे. तुकाराम यांना अस्वस्थ आणि त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याने शनिवारी सकाळी कशेळे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात उपलब्ध नसल्याने तब्बल दीड तास कोणतीही वैद्यकीय मदत मिळाली नाही. तेथे सेवेत असलेल्या डॉक्टरांनी रक्त तपासणी केली आणि नंतर पुन्हा कोणतेही उपचार सुरू केले नाहीत. त्याचा परिणाम तुकाराम यांची प्रकृती गंभीर झाली. तेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांनी आरडाओरड सुरू केल्यानंतर सेवेत असलेले वैद्यकीय अधिकारी ऋग्णाजवळ पोहचले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांचा वेळकाढूपणा आणि हलगर्जीपणामुळे तुकाराम गावंडा यांचा मृत्यू झाला. त्याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.