सिव्हील इमारतीचा रँप तोडल्यामुळे पावसाळ्यात होणार रुग्णांचे हाल

लिफ्ट अभावी उडणार रुग्णांची तारांबळ
पावसाळयात रँपचे काम पूर्ण होणे कठीण; सरकारी अधिका-यांची कबूली
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सध्या अलिबाग सरकारी रुग्णालयाच्या रँपचे काम सुरु आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम सुरु आहे. काम अतिशय संथ गतीने सुरु असल्याने पुढील सहा महिने हे काम होईल असे दिसत नाही. यातील गंभीर बाब म्हणजे इमारतीमध्ये अस्तित्वात असलेल्या लिफ्टच्या पॅसेजमध्ये पावसाच्या कालावधीत पावसाते पाणी साठते. त्यामुळे लिफ्ट बंद ठेवावी लागते. त्यामुळे पावसाळ्यात रँप आणि लिफ्ट बंद राहील्याने रुग्णांना पहिल्या आणि दुस-या मजल्यावर न्यायचे कसे असा प्रश्‍न उपस्थित होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता राजीव डोंगरे यांनी सदर रँप हा मुख्य इमारतीषी कनेक्टेड असल्यामुळे तो तोडताना काळजीपूर्वक काम करावे लागते. तसेच संपूर्ण नवीन रँपचे काम पावसाळयात पूर्ण होण्याची शक्यता कमी असून लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न बांधकाम विभागामार्फत करण्यांत येईल अशी प्रतिक्रीया दिली आहे. सिव्हील हॉस्पीटलच्या दुरूस्तीचे काम हे दिड कोटीचे असून हे काम महेंद्र रियालीटीज मुंबई हे करीत आहेत अशी माहितीही बांधकाम विभागाचे उप अभियंता डोंगरे यांनी दिली आहे.

सरकारी रुग्णालयासाठी मध्यंतरी सुमारे दहा कोटी रुपये नुतणीकरणासाठी खर्च करण्यात आले आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी इमारतीला टेकू लावण्यात आले होते. इमारत केव्हाही कोसळण्याची स्थिती असल्याने रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, अधिकारी, कर्मचारी यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, नव्याने इमारत उभारण्यात यावी अशी मागणी केली होती.

कोरोना कालावधीमध्ये आरोग्य व्यवस्थेसाठी अलिबागच्या जिल्हा सरकारी रुग्णालया मध्ये विविध सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. मात्र मनुष्यबळाची कमतरता असल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे. तसेच शवागृहाची झालेली दुरावस्था, इमारतीचा तोडण्यात आलेला रँप, इमारतीला पडलेला खासगी वाहनांचा विळखा अशा विविध समस्येने जिल्हा रूग्णालय ग्रासले आहे.

Exit mobile version