खड्डे भरण्यासाठी वापरले पेव्हर ब्लॉक

पातळगंगा एमआयडीसी प्रशासनाचं दुर्लक्ष
| पाताळगंगा | वार्ताहर |
पाताळगंगा परिसरात अनेक कारखाने असून, याठिकाणी वाहनांची रेलचेल सातत्याने असल्यामुळे या ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात आले होते. मात्र, काही ठिकाणी खड्डे पडल्यामुळे या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले. मात्र, वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे पेव्हर ब्लॉक विखुरले गेले असून, अपघातांची समस्या गंभीर बनत आहे.

या मार्गावर मागील तीन आठवड्यांमध्ये अपघात झाले आहेत. यामध्ये काहींना गंभीर दुखापत झाली असून, काहींना आपले प्राण गमवावे लागले आहे. रस्ता खराब झाला की याकडे दुर्लक्ष केले जाते. काही वेळा आपली वेळ काढावी यासाठी पेव्हर ब्लॉकसारखा वापर करुन खड्डे भरले जातात. परिणामी, हेच खड्डे अपघातांचे केंद्रबिंदू बनत आहेत.

दिवाळी काही दिवसात संपेल. मात्र, या रस्त्यावरील पडलेले खड्डे मात्र जैसे थे अशीच स्थिती या ठिकाणी पहावयास मिळत आहे. मात्र, असे असले तरीसुद्धा एमआयडीसी प्रशासन याकडे पाठ फिरवत आहे. पाताळगंगा परिसरात शिप्ला कॉर्नर कैरा कॉर्नर समोरील रस्त्यामध्ये पेव्हर ब्लॉक निघून खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. परंतु, एमआयडीसी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी ही समस्या अधिक गंभीर बनत आहे.

Exit mobile version