उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाडांची बाजी
| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारी समितीची त्रैवार्षिक निवडणूक आज पार पडली आहे. या निवडणूकीचा निकाल देखील समोर आला आहे.या निवडणूकीत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्ष पदी जितेंद्र आव्हाड यांची निवड झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी नवीन शेट्टी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. तर एमसीएच्या कार्यकारीणी सदस्यपदी मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती झाली आहे. एमसीएच्या सचिव पदी उमेश खानविलकर यांची वर्णी लागली आहे, तर संयुक्त सचिवपदी निलेश भोसले आणि खजीनदार पदी अरमान मलिक निवडून आले आहेत.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 378 मतदारांपैकी 362 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. तर शिवसेना उबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदान केलं नसल्याची माहिती मिळाली होती. हे मतदान पार पडल्यानंतर लगेचच मतमोजणी घेण्यात आली होती. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर आज (बुधवारी) ॲपेक्स कौन्सिल आणि टी-20 मुंबई गव्हर्निंग कौन्सिलच्या निवडणुकीचे मतदान पार पडले. उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार तसेच अन्य पदासाठी हे मतदान पार पडले. एमसीएच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांचा सहभाग घेतल्याने रंगत वाढल्याचे चित्र दिसून आले. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक, भाजपाचे आ. प्रसाद लाड, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना (ठाकरे) मिलिंद नार्वेकर या राजकीय नेत्यांनी निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग घेतला. अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली असली तरी बाकीच्या पदांसाठी निवडणुकीत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता होती. पण अखेर यात अजिंक्य नाईक त्यांच्या पॅनेलचे 12 उमेदवार विजयी झाले आहेत. तर जितेंद्र आव्हाड हे उपाध्यक्षपदी विजयी झाले आहेत.
अनेक दिग्गजांनी केले मतदान
बुधवारी दुपारी 3.00 ते सांयकाळी 6.00 वाजेपर्यंत मतदान पार पडले. तर या निवडणुकीत एकूण 378 मतदार होते. यामध्ये माजी खेळाडू 52 आहेत. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, रामदास आठवले, आ. जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर, प्रसाद लाड, नाना पटोले, अदिती तटकरे, आशिष शेलार, माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, संजय मांजरेकर, वसीम जाफर आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे आदी दिग्गजांनी मतदान केलं. तसंच एकूण 330 पेक्षा अधिक सभासदांनी मतदान केले. दरम्यान, मतदान पार पडल्यानंतर साधारण सायंकाळी 6.30 ते 7 वाजल्यानंतर मतमोजणीस सुरुवात झाली.
आमच्या मैदान क्लब्स, सचिव आणि प्रत्येक महिला व पुरुष क्रिकेटपटूंच्या एकत्रित परिश्रमांची विजयगाथा आहे. हा विजय संपूर्ण मुंबई क्रिकेट परिवाराचा आहे. आपल्या शहराच्या क्रिकेट परंपरेचा अभिमान आहे.
अध्यक्ष अजिंक्य नाईक
मुख्य पदाधिकारांसाठी निवडणूक निकाल
1) अध्यक्ष – अजिंक्य नाईक – बिनविरोध
2) उपाध्यक्ष – जितेंद्र आव्हाड विरुद्ध नवीन शेट्टी. यात जितेंद्र आव्हाड एकूण 201 मते मिळवून विजयी तर नवीन शेट्टी यांना 155 मते मिळाली.
3) सचिव – शाह आलम शेख विरुद्ध उन्मेष खानविलकर लढत. यात उन्मेष खानविलकर हे विजयी झाले. त्यांना 227 मते मिळाली तर शाह आलम शेख यांना 129 मते मिळाली.
4) सहसचिव – गौरव पयाडे विरुद्ध निलेश भोसले लढत होती. यात निलेश भोसले यांचा विजय झाला.
5) खजिनदार – अर्मान मलिक विरुद्ध सुरेंद्र शेवाळे यांच्यात लढत होती. यात अर्मान मलिक यांचा विजय झाला.







