। पनवेल । वार्ताहर ।
सिडको आणि महानगरपालिका या दोन्ही आस्थापनामध्ये सिडको वसाहतीतील जनता भरडली जात आहे. कळंबोली सेक्टर 2 व सेक्टर 6 मधील उद्याने डंपिंग ग्राऊंड बनली आहेत. गेल्या काही दिवसांपासून कचरा उचलला गेल्या नसल्याने नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. तेव्हा तो कचरा ताबडतोब उचलण्यात यावा व मद्यपींचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
कळंबोली सेक्टर 2 मधील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले पे अँड पार्क उद्यान एक वेळ कळंबोली शान वाढवत होते. त्याच्या संरक्षण भिंती गायब आहेत. ते आज लोप पावत आहे. तर, साईनगर वसाहतीजवळ सिडकोचे उद्यान असून, हे शहरातील महत्त्वाचे उद्यान आहे. याला लागूनच नाला गेला असून, तो सिडकोकडून एक-दोन वर्ष साफ केला गेला नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. तो नाला पनवेल महानगर पालिकेकडून साफ करण्यात आला, पण त्यातील घाण उद्यानात टाकण्यात आल्याने त्याचा नागरिकांना मोठा त्रास होत आहे. मात्र, सिडकोकडून पालिकेकडे हस्तांतर व येथे सुरक्षा रक्षक नसल्याने या उद्यानाचे सौंदर्य लयास गेलेले आहे. आजमितीस ते उद्यान गर्दुल, मद्यपी, जुगारी आणि भिकार्यांचे ठिकाण बनले आहे.