महाडजवळ भीषण अपघात! कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

। महाड । प्रतिनिधी ।

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाडजवळील धारिया पेट्रोल पंप परिसरात भीषण अपघात घडला. भरधाव मारुती व्हॅगनार कारने दिलेल्या जोरदार धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी (दि.21) सकाळच्या सुमारास घडली. राकेश जयदेव जगे शिया (वय 54, रा. महाड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथून अजित रवींद्र गुदले (वय 34, रा. मुळशी) हे आपल्या व्हॅगनार कारने चिपळूणच्या दिशेने जात होते. दरम्यान, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाडजवळील धारिया पेट्रोल पंप परिसरात आले असता त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. यावेळी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या राकेश जगे शिया यांना कारची जोरदार धडक बसली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे, हेडकॉन्स्टेबल मोरे आणि पोलीस शिपाई ढाकणे यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातामुळे झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनांच्या वेगाचा आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Exit mobile version