अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

। पनवेल । प्रतिनिधी ।

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कोनगावजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसल्याने पनवेल तालुका पोलिसांनी नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर कोनगाव परिसरात हा अपघात झाला. अज्ञात वाहनचालकाने भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवून रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्तीचे अंदाजे वय 35 ते 40 वर्षे असून वर्ण गोरा, बांधा मध्यम, केस काळे आणि नाक सरळ आहे. मृतदेहावर काळ्या रंगाची पँट आणि काळ्या रंगाचा शर्ट आढळून आला आहे. मात्र, मृत व्यक्तीचे नाव व पत्ता याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Exit mobile version