बाप्पाच्या माहेरघरात मूर्तीकारांची लगबग

पेणमध्ये गणेशमूर्ती बनविण्याचे काम युद्धपातळीवर
कोरोना काळातही मूर्तीकार कामात मग्न
पेण | वार्ताहर |
सलग दुसर्‍या वर्षीही कोरोनाचे संकट डोक्यावर असले तरी गणेशमूर्तीचे माहेरघर म्हणून समजल्या जाणार्‍या पेण तालुक्यातील मूर्तिकारांचे हात गणेशमूर्ती घडविण्यात दंग आहेत. तीन महिन्यावर येउन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी पेण तालुक्यातील विविध ठिकाणी बाप्पा आकार घेऊ लागले असून, रंगकामास सुरुवात झाली आहे. गणेशमूर्ती परराज्यासह सातासमुद्रापार पोहोचल्या आहेत. मूर्ती तयार करण्यातील सुबकता आणि आकर्षक रंगसंगती, कारखानदार, कलाकार, कारागिरांचे अविरत कष्ट, त्यांची चिकाटी, प्रामाणिकपणा, नाविण्यपणा देण्याचा प्रयत्न, कुशलता यासारख्या बाबी या व्यवसायात पेणचे नावलौकिक ठरण्यास कारणीभूत आहेत. यावर्षी अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि मॉरिशस येथे 25 ते 39 हजार गणेशमूर्ती पाठवण्यात आल्या आहेत.

गणेशमूर्तिकारांचे गाव म्हणून प्रसिध्द असणार्‍या पेणमधून दरवर्षी जवळपास 50 लाख गणेशमूर्ती देशभरात पाठवण्यात येतात. कच्च्या मालाच्या किंमती आणि कामगारांची मजुरी वाढल्याने गणेशमूर्तींच्या किंंमती गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 ते 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

डोळ्यांची सुबक आखणी, आकर्षक रंगसंगती आणि देखणी मूर्ती हे पेणमधील गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे पेणच्या गणेशमूर्तींना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर, देशविदेशातून मागणी वाढत आहे. पूर्वी पेण शहरापुरता मर्यादित असणारा हा व्यवसाय आज तालुक्यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात पसरला आहे. हमरापूर, जोहे, कळवा, अंतोरा, वडखळ, दादर, बोरी, शिर्की, कणे, बोर्झे या परिसरांतही अधिक लहानमोठे कारखाने सुरु झाले आहेत. जोहे, हमरापूर, ही गावे तर कच्च्या गणेशमूर्तीची बाजारपेठ म्हणून झपाट्याने विकसित झाली आहेत. गणेशमूर्तीचे हब म्हणून उदयास आलेल्या या गावांतून देशातील अनेक भागात कच्च्या मूर्ती पाठविल्या जातात. तसेच अनेक मूर्तिकार येथे येउन कच्च्या मूर्ती नेऊन त्या रंगवून बाजारात विकतात. हमरापूर, वडखळ, दादर, बोरी, शिर्की या परिसरातील गावांत गणेशमुर्ती बनवणारे लहान-मोठे पाचशेहून अधिक कारखाने सुरु झाले आहेत. या कारखान्यांमधून दरवर्षी जवळपास 15 ते 20 लाख गणेशमूर्ती बनवल्या जाऊ लागल्या आहेत.

यंदा किंमतीत 20 ते 30 टक्के वाढ
पेण शहर व तालुक्यातील कारखान्यांत गणेशमूर्ती बनवण्याचे काम वर्षभर सुरु असते. यातून सुमारे एक लाख लोकांना रोजगार मिळतो. तालुक्यात दरवर्षी साधारपणे 250 ते 300 कोटींची वार्षिक उलाढाल होते. गणेशभक्तांचा कल आणि मागणी लक्षात घेऊन दरवर्षी नवीन प्रकारच्या गणेशमूर्ती तयार केल्या जातात. चित्रपट, मालिका यांचा विशेष प्रभाव दिसतो. मात्र, यावर्षी लाल मातीच्या व शाडू मातीच्या मूर्तीची मागणी वाढल्याने कमी उंचीत लाल मातीच्या व शाडूमातीच्या मूर्ती बनविण्यात गणपती कारखानदारांनी झुकत माप दिल आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक बंधने आमच्यावर येत असून, कामगारांचादेखील तुटवडा आम्हा कारखानदारांना येत आहे. एकीकडे कामगारांची कमतरता असल्याने घरातील महिलावर्गदेखील गणेशभक्तांच्या मूर्तीच्या मागणीचा विचार करून आम्ही युद्धपातळीवर अहोरात्र काम करत आहोत.
अजित लांगी (मूर्तीकार), श्री गावदेवी कलाकेंद्र

Exit mobile version