| पेण | प्रतिनिधी |
पेण अर्बन बँक बुडवून लाखो ठेविदारांना देशोधडीला लावणाऱ्या शिशिर धारकरांना ठाकरे गटात सोमवारी प्रवेश दिला जाणार आहे. यावरुन पेणमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. पेण अर्बन बॅक आर्थिक घोटाळयात सापडली आणि रायगडसह मुंबईतील 18 शाखांचा काम ठप्प झाला. आज 13 वर्ष झाली परंतु खातेदार ठेविदार आजही पैसे मिळतील या आशेवर जगत आहेत. परंतु यातील मुख्य आरोपी असणारे शिशिर धारकर हे तुरुंगातून सुटल्यावर पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसत आहे.
पहिल्यांदा शहरात प्रवेश मिळविण्यासाठी मा. मंत्री रविशेठ पाटील यांच्या सलगी वाढवण्याचा प्रयत्न केला. त्या नंतर त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांजवळ थोडीशी चापलोसी केली. ते जमत नाही तेव्हा थेट ठाणे गाठून तत्कालीन नगरविकास मंत्री तथा आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथे ही काही डाळ शिजली नाही, नंतरच्या काळात शिवसेनेत फूट पडली आणि शिशिर धारकर यांनी ठाकरे गटाची कास धरण्याचे ठरविल आमदार विलास पोतनीस यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या समर्थकांना त्यांनी पेण गांधी मंदिर सभागृहामध्ये ठाकरे गटात प्रवेश करून घेतला. आता सोमवारी नागपंचमीच्या दिवशी धारकरांसाठी मातोश्रीसाठी दरवाजे उघडे झाल्याचे बॅनर पेण शहरात जागोजागी लागले आहेत. मात्र मातोश्रीच्या राजाला शिशिर धारकर हे पेण अर्बन बॅकेतील मुख्य आरोपी आहेत या बद्दल विसर पडलेला दिसतो अशी टीका आता सर्व स्तरातून होत आहे.