। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबई महापालिका, परिवहनमधील कंत्राटी कामगारांची वेतनवाढ व अन्य सुविधांचा विषय लवकर मार्गी लावण्याच्या श्रमिक सेनेच्या मागणीच्या अनुषंगाने राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या समवेत मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनास काही महत्वाच्या सूचना करून कंत्राटी कर्मचार्यांच्या वेतन वाढीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिले.
नवी मुंबई महापालिकेमध्ये सुमारे आठ हजार साफसफाई कर्मचारी ठेकेदारांमार्फत कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. तर नवी मुंबई परिवहनमध्ये 1400 आणि महापालिकेमध्ये एक हजार कर्मचारी ठोक मानधन, रोजंदारी आणि सहा महिने नियुक्ती तत्वावर कार्यरत आहेत. परंतु, 2010 पासून या कर्मचार्यांना मिळणारे वेतन तुटपुंजे आहे. नवी मुंबई महापालिकेमधील कंत्राटी कामगारांच्या वेतन वाढीच्या प्रश्नावर श्रमिक सेनेने राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे विनंती केली होती. त्यानुसार मंत्री गणेश नाईक यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या समवेत श्रमिक सेना शिष्टमंडळाची बैठक घडवून आणली.
शिष्टमंडळाच्या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी पालिका प्रशासनाने कंत्राटी कामगारांच्या वेतन वाढीसाठी नियुक्त केलेल्या श्रीवास्तव समितीचा अहवाल एका आठवड्यात सादर करण्याचे निर्देश दिले. महापालिका ही स्वायत्त संस्था असल्याने त्यांनी हा अहवाल प्राप्त होताच पुढच्या एका आठवड्यात वेतन वाढीचा निर्णय घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, असे महापालिका प्रशासनाला आदेशित केले. नवी मुंबई महापालिकेत कंत्राटी कर्मचार्यांची संख्या अधिक असल्याने हा निर्णय फक्त नवी मुंबई महापालिकेला लागू होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.