। वडखळ । वार्ताहर ।
तालुक्यातील हेटवणे धरणाच्या पाण्यामुळे पूर्व विभागातील असंख्य शेतकरी उन्हाळी दुबार भातशेती पिकाकडे वळले आहेत. त्यामुळे शेतकर्यांच्या आर्थिक उत्पनात वाढ झाली आहे. हेटवणे धरणाच्या पाण्याचा फायदा शेतीसाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे तालुक्यात ऐन उन्हाळ्यातही भातशेती बहरली आहे. त्यातच उन्हाळ्यातील दुबार भातशेतीला कीड, रोग, पूर, अतिवृष्टी, असा कोणताही धोका नसल्याने भातपीक चांगले येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
एकेकाळी रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जात होता, मात्र वाढत्या औद्योगिक क्षेत्रामुळे येथील शेतकरी आता शेतीपासून दूर जाऊ लागला आहे. काही तालुक्यांतील बहुतांश शेतकरी आता दुबार शेतीपिकाकडे वळले आहेत. त्यामुळे तालुक्यातील हेटवणे धरणाच्या कालव्यातून येणार्या पाण्यामुळे खारेपाट वगळता इतर अनेक गावांना सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे.
त्यामुळे पूर्व भागातील अनेक शेतकरी उन्हाळी भातशेतीबरोबर भाजीपाला, वेलवर्गीय अशा विविध पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करत आहेत. येथील कामार्ली, तळवली, आधारने, सापोली, शेणे, बोरगाव या भागातील शेतकरी सध्या उन्हाळी भातशेती आणि भाजीपाला लागवडीकडे वळले आहेत. तालुक्याच्या कृषी विभागाच्या अंतर्गत सहा हजार 668 हेक्टर क्षेत्रांपैकी एक हजार 800 हेक्टर भातशेतीची उन्हाळ्यात लागवड करण्यात येत आहे. पावसाळ्यातील शेतीपेक्षा उन्हाळ्यातील भातशेती जास्त फायद्याची ठरत असल्याचे शेतकरीवर्गाकडून सांगण्यात येत आहे, तर खारेपाटातील शेतकर्यांना मात्र पाण्याअभावी नुकसान सहन करावे लागत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पेण तालुक्यातील हेटवणे धरणाचे पाणी कालव्याद्वारे शेतीला मिळत असल्याने येथील असंख्य शेतकर्यांनी पावसाळी भातशेतीपेक्षा उन्हाळी भातशेती लावली आहे. त्यात भातशेतीमध्ये चांगले पीक आले असून, त्याबरोबर भाजीपाल्याचीसुद्धा लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्याचा शेतकर्यांना चांगला फायदा होत आहे.
नितेश जाधव,
शेतकरी, पूर्व विभाग