। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सर्व कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने महाराष्ट्रात दिनांक 21 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत एनपीएस हटाव सप्ताह आयोजित केला आहे.
महाराष्ट्र शासनाने दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पासून शासकीय सेवेत येणार्या कर्मचारी यांना नविन राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली आहे. ही योजना अन्यायकारक असुन सर्वाना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करावी, या मागणीकरीता राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सातत्याने विविध आंदोलन करीत आहे.
सर्वाना जूनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीकरीता दिनांक 21 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत एनपीएस हटाव सप्ताह महाराष्ट्रातील सर्व जिल्हयात आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालय, स.आयुक्त सामाज कल्याण कार्यालय, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय इत्यादी कार्यालयात सभा घेण्यात आल्या. अलिबाग येथे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष संदीप नागे यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या पदाधिकारी यांनी निवासी उप जिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील यांना निवेदन सादर केले.
यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, राज्य प्रतिनिधी परशुराम म्हात्रे, कोषाध्यक्ष दर्शना पाटील, प्रफुल्ल कानिटकर, दर्शना कांबळे, संजय पाटील, वासुदेव पाटील, इत्यादी सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी पदाधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.