‌‘जनता दारात, साहेब घरात’

| उरण | प्रतिनिधी

उरण तालुक्यातील शासकीय कार्यालयांची दारे जनतेच्या तक्रारींनी गजबजलेली असून, येथील साहेबांच्या खुर्च्या मात्र रिकाम्या आहेत. शासनाने सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सव्वासहा अशी वेळ ठरवली आहे. परंतु, उरणमधील शासकीय अधिकारी व कर्मचारी हा नियम उघडपणे धाब्यावर बसवत आहेत.

शासनाचे नियम पाळणे ही अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते. परंतु, उरणमध्ये ही जबाबदारी उघड उघड पायदळी तुडवली जात आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या उर्मटपणामुळे सर्वसामान्य जनता वेठीस धरली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनेतेचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जातात. जनतेची कामे करण्याऐवजी आरामशीर नोकरी हीच त्यांची मानसिकता झाली आहे. येथील शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कार्यालयात उशीरा येऊन वेळेआधिच कार्यालयातून बाहेर पडतात. ते गेले की लगेचच कर्मचाऱ्यांचा देखील पलायन मोर्चा निघतो. हा मनमानी कारभार वर्षानुवर्षे चालू आहे. हा प्रकार थांबवायचा असेल तर शासनाने तातडीने कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे. केवळ आदेश काढून किंवा फाइल हलवून जनता समाधानी होणार नाही. उरणकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कारभार आवरला नाही, तर जनता आता रस्त्यावर उतरून हक्कासाठी झुंजार लढा देईल, असा गंभीर इशारा देण्यात आला आहे.

Exit mobile version