राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून आता पुढे सरकली आहे. शेगावच्या सभेतल्या गर्दीवरून मोजमाप करायचे तर राहुल यांना महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळाला असं म्हणावं लागेल. तमिळनाडूतून निघालेली ही यात्रा केरळ, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांमधून महाराष्ट्रात आली. या राज्यांमध्ये काँग्रेसचे अस्तित्व अजून बर्यापैकी टिकून आहे. आता यात्रा मध्य प्रदेश म्हणजे हिंदी पट्ट्यात प्रवेश करीत असून तिथे राहुल आणि काँग्रेसची खरी कसोटी लागणार आहे. त्यातही मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेस हा सत्तेत किंवा सत्तेची दावेदारी करू शकतो अशा स्थितीत आहे. पण नंतर उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये मात्र त्याची अवस्था दारुण आहे. नफरत छोडो आणि डरो मत असे नारे देत राहुल चालले आहेत. केंद्रातील भाजपचे सरकार विरोधकांच्या मागे सीबीआय किंवा ईडी लावून देत आहे. मिडियामधून या त्यांचा आवाज दडपला जात आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला लोकांपर्यंत पोचण्यासाठी दुसरा मार्गच उरलेला नाही असे राहुल यांचे म्हणणे आहे. राहुल यांची आजवरची प्रतिमा ही मनमौजी तरुण, राजकारणात रस नसलेले आणि अचानक गायब होणारे अशी होती. या यात्रेने तिला चांगलाच छेद दिला आहे. राहुल खरोखरच जमिनीवर असून ते प्रदीर्घ काळ लोकांमधून चालत आहेत, याचा जनतेवर नक्कीच प्रभाव पडेल. नेतेमंडळी केवळ विमाने आणि मोटारीने दौरे करतात व निघून जातात असा त्यांच्यावर आरोप होत असतो. राहुल यांच्या पदयात्रेने तो त्यांच्यापुरता निरस्त होईल. राहुल हे या यात्रेत ठिकठिकाणच्या लोकांचे प्रश्न ऐकून घेत आहेत. खरे तर हे त्यांनी फार पूर्वी करायला हवे होते. पण उशिराने का होईना त्यांना जाग आली हेही कमी नाही. या यात्रेत समाजवादी, डावे, समविचारी सहभागी होत आहेत. शिवसेनेसारखा आजवरचा काँग्रेसचा कडवा विरोधकही यात्रेत उतरला. भाजपच्या दडपशाहीमुळे या विरोधकांना एकत्र आणले आहे. महाराष्ट्रातील सावरकरांचा मुद्दा वगळला तर राहुल यांनी आजवर अनावश्यक वाद कटाक्षाने दूर ठेवून आपल्या मुख्य मुद्द्यांवरच लक्ष केंद्रीत केले आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम अनुकूल आहे. मात्र याचा निवडणुकीत भाजप आणि मोदींना हरवण्यासाठी फारसा उपयोग होणार नाही यावर बहुतेकांचे एकमत आहे. भाजपने राम, मंदिर, गाय, हिंदुत्व यांच्या नावावर लोकांवर असे काही मायाजाल पसरले आहे की त्यातून ते सहजासहजी बाहेर पडण्याची चिन्हे नाहीत. त्यातच वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे आणि फेसबुक, व्हॉटसॅपसारखी माध्यमे यांच्यामध्ये प्रचार करण्यासाठी ठेवलेल्या पगारी फौजांपुढे विरोधकांची मात्रा चालत नाही. यात्रेमुळे राहुल यांच्याविषयी एक सर्वसाधारण सदिच्छा निर्माण झाली तरी काँग्रेसची यंत्रणा इतकी ढासळलेली वा पोकळ आहे की त्यांचे मतांमध्ये परिवर्तन अवघड आहे. राहुल समस्या ऐकून घेत आहेत याचे अनेकांना कौतुक वाटते. पण सुमारे साठ वर्षे निरंकुश सत्ता भोगलेल्या काँग्रेसचे आणि नेहरु-गांधी परिवाराचे राहुल हे प्रतिनिधी म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांनी निव्वळ प्रश्न ऐकून न घेता ते सोडवण्याचा ठोस कार्यक्रम द्यावा अशीही लोकांची अपेक्षा असते. एखादा भंपक कार्यक्रमदेखील नेत्याने ठाम व जोरकस शब्दात मांडला की गर्दी त्याच्यामागे जाते हा आपला सततचा अनुभव आहे. लोकपाल हा सर्व दुखण्यांवरचा इलाज असल्याचा कार्यक्रम विकणारे अण्णा हजारे किंवा अच्छे दिन आयेंगे असं सांगणारे नरेंद्र मोदी ही त्याची अलिकडची उदाहरणे आहेत. राहुल यांच्याकडे असा कोणताही कार्यक्रम नाही. डाव्या ते उदारमतवादी अशा सर्वच लोकांनी वेढलेले असल्याने त्यांची म्हणून विचारसरणी कोणती हेही नीट स्पष्ट होत नाही. यात्रा विंध्याचलाच्या उत्तरेला आणि राजधानीच्या जवळ सरकत असताना राहुल यांना याचं उत्तर द्यावंच लागेल. आजवर यात्रेच्या फोटोंमध्ये मुले व स्त्रिया बर्याचदा आहेत. पण शेतकर्यांसोबत शेतात जाऊन केलेला किंवा कष्टकर्यासोबत जमिनीवर बसून केलेला संवाद अभावानेच दिसला आहे. त्यामुळे यात्रेचा तोंडवळा सद्भावना दिंडीसारखा आहे. तो बदलून दुसर्या टप्प्यात यात्रा ठोस राजकीय होईल अशी अपेक्षा.
लोकांना उत्तर हवंय

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
by
Antara Parange
April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
by
Antara Parange
March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
by
Antara Parange
March 8, 2025
भारताचे मिशन ‘मेडल्स’
by
Santosh Raul
July 22, 2024