। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला असला तरी नोटाला मात्र 2019 च्या तुलनेत कमी मतदान झाले आहे. गेल्या वेळी 12 हजार 399 मतदारांनी नोटाला पसंती दिली होती. या निवडणुकीत हा आकडा खाली आला असून केवळ तीन हजार 905 मते नोटाला मिळाली आहेत. त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतसुद्धा यापेक्षा जास्त जणांनी नोटा पर्यायाचा वापर केला. त्यामुळे हा टक्का घसरल्याचे एकंदरीत दिसून आले.
मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य मानून त्या लोकशाहीच्या उत्सवात आपण सहभागी होणे आवश्यक आहे. आपले एक मत हे खूप अनमोल मानले जाते. त्याच्यामुळे एखाद्या उमेदवाराचा पराभव; तरं कोणाचा तरी विजय होऊ शकतो. याशिवाय जर मतदारांना कोणताही उमेदवार पसंत नसेल तर आपण नोटाचा पर्याय वापरू शकतो. मतदान यंत्रावर नोटाचे सर्वात शेवटी बटन असते. पनवेल हे मिश्र लोकवस्तीचे ठिकाण आहे. या परिसरामध्ये सुशिक्षित मध्यमवर्गाचा प्रभावसुद्धा मोठा आहे. याव्यतिरिक्त उच्चभ्रू सोसायटीतील लोकही या भागात राहतात.
2019ला पनवेल विधानसभा मतदारसंघात 12 हजार 399 मतदारांनी नोटाचा वापर केला होता. आता दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात 3,905 मतदारांनी नोटाला मतदान केले. त्यामुळे यावेळी हा पर्याय खूपच कमी मतदारांनी वापरल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीत पनवेल विधानसभा मतदारसंघातील 4,400 मतदारांनी नोटाचे चिन्ह दाबून सर्वच उमेदवारांना नापसंती दिली होती; मात्र हे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
समस्या, प्रश्न आणि अडचणी या प्रत्येक मतदारसंघात असतात. उमेदवारांचे प्लस-मायनस पॉईंट असतात. त्यामुळे कोणा एकाची मतदाराला निवड करावी लागते. यापैकी कोणीही पसंत नसेल तर नोटा हा पर्याय निवडणूक आयोगाने दिलेला आहे. मागील निवडणुकीत पनवेल विधानसभा मतदारसंघात अपक्षेपेक्षाही नोटाला अधिक पसंती मिळाली होती; परंतु यावेळी हा आकडा आठ हजाराने ही कमी झाला आहे.
वैशाली जगदाळे, अध्यक्ष,
संकल्प शैक्षणिक व सामाजिक संस्था.