। तुर्भे । वार्ताहर ।
विधानसभा निवडणुकीनंतर शहराला पुन्हा अनधिकृत होर्डिंगचा विळखा पडला आहे, मात्र याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे, तसेच संबंधित होर्डिंग लवकरात लवकर हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी उमेदवारांच्या जाहिराती शहरात मोठ्या प्रमाणात विनापरवाना लावण्यात आल्या आहेत. यामुळे शहराला विद्रूपीकरण आले आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते, मात्र त्यांच्या या आदेशाला न जुमानता राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी राजरोस मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग लावले आहेत. याप्रकरणी होर्डिगवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
अनधिकृत होर्डिंगमुळे नवी मुंबई महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. असे असतानाही महापालिका प्रशासन त्याकडे कानाडोळा करताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई महापालिकेचे मुख्यालय असलेल्या किल्ले गावठाण चौकातही अनधिकृत होर्डिंग लावण्यात आलेले आहेत, तसेच तुर्भे नाका, तुर्भे स्टोअर, आयसीएल शाळा चौक, अरेंजा सर्कल, कोपरखैरणे डी- मार्ट, ऐरोली सेक्टर पाच चौक, घणसोली, सीबीडी बेलापूर येथील कोकण भवन चौक, पोलिस आयुक्तालयाकडे जाणारा चौक, दिवाळी गाव, अग्रोली गाव, नेरूळ अक्षर चौक, गायमुख चौक, सारसोळे बस डेपो, समाधान चौक, एलपी चौक, राजीव गांधी उड्डाणपूल चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग लागलेले आहेत. बहुतेेक होर्डिंग पालिकेची कोणतीही परवानगी न घेता लावण्यात आलेले आहेत.