Alibag News: जिल्हा रुग्णालयातील पीओपीचा तुकडा कोसळला; सुदैवाने जीव वाचला

। रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।

अलिबाग मधील जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूती पश्चात काळजी कक्षामध्ये एका खाटेवर पीओपीचा मोठा तुकडा कोसळला. प्रसुती झालेल्या महिलेला त्या खाटेवरून अन्य ठिकाणी अगोदरच हालवल्याने सुदैवाने मोठे जीवितहानी टळली. ही घटना रविवारी (दि.5) सायंकाळी रुग्णालयात घडली असल्याची माहित समोर येत आहे. या घटनेने पुन्हा एकदा जिल्हा रुग्णालयातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर प्रसुती पश्चात काळजी कक्ष आहे. प्रसूती झालेल्या महिलांना या कक्षामध्ये उपचारासाठी ठेवले जाते. प्रसूती झालेली महिला या कक्षात उपचार घेत होती. दरम्यान अचानक एका खाटेवर पीओपीचा भाग कोसळला. मात्र, अगोदरच उपचार घेत असलेल्या महिलेला अन्य ठिकाणी हलविण्यात आले होते. त्यामुळे त्या महिलेचा सुदैवाने प्राण वाचला. जिल्हा रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी करोडो रुपये खर्च करून ही तो खर्च या घटनेनंतर पुन्हा एकदा पाण्यात गेल्याचे चित्र समोर आले. त्याच वेळेला मेल सर्जिकल वार्डमध्येही स्लॅब कोसळल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वीही रुग्णालयात स्लॅब , पीओपीचा भाग कोसळण्याची घटना घडली आहे. तरी देखील रुग्ण प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांच्याकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याची संतप्त प्रतिक्रिया रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version