पहिल्या भेटीचे गुलाबी क्षण…

। अमोल सांबरे । पालघर ।
एका युवकाची आणि एक मुलीची कोकणातील एका पेपरच्या सदरामधील ‘संदेसा आता है’ एसएमएसवरुन ओळख झाली. त्यानंतर एसएमएसच्या माध्यमातून रोजच बोलणं सुरु झालं. ती त्यावेळेस नुकतीच महाविद्यालयीन परीक्षा पास झाली होती. तिने ही नुकतेच 21 व्या वर्षात पदार्पण केले होते. तिचे स्वप्नाच्या दुनियेत हरवून जाण्याचे ते गुलाबी क्षण..


साध्या मोबाईलचा जमाना होता तो. एसएसएसवर रोजच बोलता-बोलता ते एवढे चांगले मित्र झाले, की एकमेकांशी गप्पा मारल्याशिवाय ते राहात नसत. रोज सकाळी, दुपारी, संध्याकाळी तोही तिच्याच विचारात आणि ती त्याच्याच विचारात असायची. दिवस कसे भुरकन उडून चालले होते. दोघेपण एकमेकांत गुरफटत चालले होते. या काळात अनेक वेळा भांडणं आणि पुन्हा मैत्री असे घडू लागले. किमान एक वर्ष हे असच चालू होतं. परंतु, त्या युवकाने तिला कधीच प्रेमाविषयी सांगितले नाही. परंतु, तो तिच्यावर जीवापाड प्रेम करू लागला होता. तिला न बघता तिच्या सौंदर्याचे चित्र तो आपल्या हृदयात रेखाटू लागला होता. आणि, एक दिवस त्या मुलाने चक्क हिंमत करुन तिला विचारले, तू माझ्यावर प्रेम करतेस? दोघांनी एकमेकांना समोरासमोर कधीच पाहिले नव्हते. पण, दोघ एकमेकांत इतकी गुरफटले होते, की जगाचे भानच त्यांना उरले नव्हते. एके दिवशी ठरवले, पोस्टाद्वारे एकमेकांचे फोटो पाठवून दोघांचे स्वप्नरूपी चेहरे पहायचे.


एक वर्षानंतर तो क्षण आलाच. त्याच्या स्वप्नातील ती परी त्याला भेटली होती, तर तिलाही तो स्वप्नातील राजकुमार भेटला होता. फक्त फोटो पाहिले होते. दोन्ही बाजूंनी होकार मिळाला आणि रोजचा ‘गुड मॉर्निंग’ हा शब्द ‘आय लव्ह यू’कडे वळला… हळूहळू फोनवर बोलणं चालू झालं. तो नेहमी तिला म्हणायचा बर्‍याच जणांचे प्यार आँखोसे शुरू होकर दिल में उतर जाता है, लेकिन हमारा एसएमएससे शुरू होकर दिल में उतर गया है. प्रेमाच्या 15 महिन्यांनंतर एके दिवशी दोघांनी भेटण्याचे ठरवले. तो दिवस होता, 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे.

प्रेमाची बातमी चक्क मुलीच्या आईला समजली, पण कोणी एवढं मनावर नाही घेतलं.त्या मुलानेही ठरविले, की आपण भेटायला जायचे. तो रायगडवरुन रत्नागिरीकडे निघाला. दोघांनाही एकीकडे प्रेमाचे अश्रू आणि पहिल्या भेटीची भीती वाटू लागली.. भेटीचे ठिकाण ठरले, रत्नागिरी स्टेशन. तोही ट्रेनने पोहोचला. दोघांनी एकमेकाला पाहिले नव्हते. त्याचे डोळे आपल्या स्वप्नातील परीचे शोध घेत होते. त्याने स्वप्न रंगवल्याप्रमाणे सत्यात उतरू लागली होती. पण, ती कुठे होती? तो रत्नागिरी स्टेशनवर वेड्यासारखा सैरभैर होऊन तिला शोधू लागला होता. अखेर ती त्याला भेटलीच रेड टॉप, जिन्स आणि हातात सॅग घेतलेली. वा! तो खुश झाला. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याने तिला ओळखले. त्याने तिच्या जवळ धावत जाऊन तिचा हाताच पकडला. त्याच्या डोळ्यातले आनंदाश्रू तो लपविण्याचा प्रयत्न करत होता. अखेर तिनेही त्याचे अश्रू हेरले. तीही खूप खुश झाली. जणू दोघांचा जन्म एकमेकांसाठीच झाला आहे. जगाचे भानच दोघांना उरले नव्हते. त्या पहिल्या भेटीच्या साक्षीला असलेल्या खुणा त्या रत्नागिरीच्या स्टेशनवर साक्ष देत आहेत. मोठे घड्याळ त्याच्याखाली.. दोघेही एकमेकांचे हात हातात घेऊन पाहात बसले होते..त्याने अलगद भर स्टेशनवर तिला कडकडून मिठीत घेतलं. 14 फेब्रुवारीच्या आठवणीतील पहिल्या भेटीचे.. गुलाबी भेटीचे.. गुलाबी क्षण..

Exit mobile version