फळ, सावली देणार्या वृक्षांची लागवड करा; वनस्पतीप्रेमींनी दिला श्रावणाच्या पूर्वसंध्येला संदेश
| खास प्रतिनिधी | रायगड |
सध्या पावसाचा हंगाम सुरु असल्याने सोमवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. श्रावण महिन्यात पृर्थ्वीतलावर हिरवा शालू पांघरलेला पहायला मिळतो. विविध सामाजिक संस्था वृक्षारोपणाचे काम करत आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये आलेल्या विविध छोट्या-मोठ्या वादळांमध्ये झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. प्रामुख्याने झाडांची मुळे खोलवर न रुजल्यानेच ती पडली आहेत. यासाठी वृक्षारोपण करताना शास्त्रीय पद्धतीने करावे, तसेच वातावरणाशी, मातीशी जुळवून घेणार्या आणि मानव, पशु-पक्षी यांना उपयोगी असणार्या वृक्षांची लागवड करावी, असे मत वनस्पतीप्रेमींनी श्रावण महिन्याच्या पूर्वसंध्येला मांडले आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षात निर्सग, तौक्ते, गुलाब यासह अन्य वादळांचा चांगलाच तडाखा बसला आहे. वादळामध्ये वाहणार्या सोसाट्यांच्या वार्यापुढे हजारो झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामध्ये स्वदेशी झाडांसह विदेशी झाडांची संख्या अधिक आहे. विदेशी झाडे ही आपल्याकडील वातावरणात व्यवस्थित रुजत नाहीत. त्यामुळे ती वादळामध्ये तग धरु न शकल्याने कोलमडून पडतात. त्याचप्रमाणे वृक्षारोपण करताना विशिष्ट अंंतराचा आणि खोलवर खड्डा न खणताच केलेले वृक्षारोपण कामी येत नाही. त्यामुळे त्यांची मुळे खोलवर जात नाहीत आणि वादळ वार्याच्या फटक्याने आडवी होतात. आपल्या वातावरणात रुजणारी, फुलणारी तसेच मानव, पशु-पक्षी यांना उपयोगी असणारी झाडे लावणे गरजेचे आहे. फळं, फुलं मिळतील तसेच भरपूर ऑक्सिजन देतील, अशी झाले लावावीत. नुसत्या शोसाठी असणारी झाडे लावून फायदा नसतो, ती आपल्याकडील वातावरणात वाढत नाहीत. तसेच त्यांचा सावली अथवा फळांसाठीदेखील उपयोग होत नाहीत.
प्रत्येक झाडाला विशिष्ट वातावरणाची, मातीची गरज असते. त्यामुळे अशी विदेशी झाडे आपल्याकडे लावल्यास ती कमी प्रमाणात तग धरतात. त्यामुळे कमी वादळी वार्याच्या तडाख्यातदेखील ती उन्मळून पडतात. त्यामुळे फायद्याऐवजी नुकसानच होते. निर्सग आणि तौक्ते चक्रीवादळामध्ये जिल्ह्याच्या विविध भागातील हजारो वृक्ष उन्मळून पडले होते. वादळाचा तडाखा जोरात असल्याने घरांवर, विजेच्या तारांवर वृक्ष पडल्याने प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. आपल्या वातावरणामध्ये रुजणार्या आणि जीवसृष्टीला आवश्यक असणार्या वृक्षांची लागवड करणे गरजेचे आहे. वृक्षारोपण करताना शास्त्रीय पद्धतीने करावे, त्यासाठी योग्य प्रमाणात खड्डा करणे, ठरावीत अंतरावर लागवड करणे, हे प्रामुख्याने लक्षात ठेवावे. विदेशी झाडे आपल्या वातावरणात तग धरत नाहीत. त्यांची मुळे सैल असल्याने ती स्वभाविकपणे उन्मळून पडतात, असे वनस्पती तज्ज्ञांचे मत आहे.
मानव, पशु, पक्षी यांना उपयोगी असणार्या झाडांची लागवड करणे आवश्यक आहे. सर्वच झाडे विविध वातावरणात वाढू शकत नाहीत. अशा झाडांना ठराविक जमीन, जमिनीचा कस, तापमान याची आवश्यकता असते. त्यामुळे अशी झाडे आपल्याकडे टिकत नाहीत. नुसती ‘शो’ची झाडे न लावता पर्यावरणाला पोषक असणारे वृक्षारोपण करणे गरजेचे आहे, असे वनस्पतीप्रेमी अरुण कांबळे यांनी स्पष्ट केले.