शासकीय कार्यालयांना प्लास्टिकचा आधार

गळती रोखण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना हवी

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुडमधील शासकीय कार्यालयात होणार्‍या गळतीला उपाय म्हणून छतावर प्लास्टिकचा वापर केला जात आहे. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ याप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून पावसाळा सुरू होताच मुरुडमधील तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालयात गळती सुरू होते आणि या गळतीला उपाय म्हणून कार्यालयांच्या छतावर प्लास्टिकचा वापर केला जातो आहे.

मुरुड हे तालुक्याचे ठिकाण असून, या ठिकाणी तहसीलदार कार्यालय, वनविभाग, पंचायत समिती, सेतू, ग्रामीण रुग्णालय अशी विविध कार्यालये आहेत. शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणांहून शासकीय कामासाठी लोकांची लगबग असते. गेल्या काही वर्षांपासून पावसाळा सुरू झाला की येथील कार्यालयांच्या गळतीला सुरुवात होते आणि मग त्यावर उपाय म्हणून प्लास्टिकचा वापर केला जातो. पावसाळ्यात होणारी गळती कायमस्वरुपी थांबण्यासाठी शासनाच्या संबंधित विभागाने लक्ष पुरवून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी जनमानसातून जोर धरीत आहे.

Exit mobile version