सायमन कॉलनीमधील नागरिकांचे हाल;दहशतीमुळे आवाज उठविण्यास भीती
| अलिबाग | प्रतिनिधी |
विकासाच्या नावाखाली जाहीरात बाजी करणाऱ्या आमदारांचे गाव खड्यात गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आमदारांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सायमन कॉलनीतील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यांना तळ्याचे स्वरुप आले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. आमदारांच्या मालकीच्या मालवाहू ट्रकमुळे या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. आमदारांची दहशत असल्याने काहीच बोलू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे एका वयोवृध्द महिलेने कृषीवलला सांगितले.
अलिबाग तालुक्यातील थळ येथील आरसीएफ कंपनीच्या समोर सायमन कॉलनी असून रस्त्याच्या दुतर्फा लहान मोठी घरे आहेत. सायमन कॉलनीत मोलमजुरी करणारा कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते. कॉलनीपासून काही अंतरावर या डोंगरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरु असून पुर्णतः डोंगर पोखरून काढला आहे. आमदारांच्या मालकीच्या असलेल्या कॉरीसाठी डोंगरामध्ये खोदकाम केले जात आहे. या डोंगरातून खोदलेला दगड मोठमोठ्या ट्रकमार्फत या सायमन कॉलनीतून वाहतूक केला जातो. रात्रंदिवस होणाऱ्या ट्रकच्या वाहतूकीमुळे रस्त्यालगत असलेल्या घरांतील नागरिकांची झोप उडत असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे.
उन्हाळ्यात धुळीचे कण घरात शिरत असल्याने आरोग्याचा प्रश्न उपस्थित होतो तर आता रस्त्यांची चाळण झाली असून संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे वाहनांसह पादचाऱ्यांनाही या मार्गावरुन प्रवास करणे कठिण झाले आहे.
धुळ, चिखलामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. एरव्ही विकासाच्या बाता मारणारे आमदार महेंद्र दळवी याकडे का दुर्लक्ष करीत आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हा रस्ता पुर्वी चांगला होता. मात्र रात्रंदिवस चालू असलेल्या ट्रकमुळे रस्ता खराब झाला आहे. या ट्रकच्या वाहतूकीचा खुप त्रास होतो. पावसाळ्यात खड्यांमध्ये पाणी साचत असल्याने डासांचा त्रास होतो. लहान मुलंदेखील याच चिखलातून शाळेत जातात. पण कोण बोलणार? असा सवाल एका वयोवृध्द महिलेेने नाव न सांगण्याच्या अटीवर उपस्थित केला.
दोन वर्षात रस्ता खड्डयात
सायमन कॉलनीमधील रस्त्यावर मालवाहू ट्रकमुळे खड्डे पडले होते. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. गेल्या दोन वर्षापुर्वी केलेल्या रस्त्याची अवस्था सध्या बिकट झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे रस्त्यावर झालेल्या चिखलातून मार्ग काढणे कठिण झाले आहे. मात्र याकडे आमदार दुर्लक्ष का करीत आहेत, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.