पाईपलाईनच्या खोदकामात राज्यमार्गाची दुर्दशा

| आंबेत | वार्ताहर |

म्हसळा येथे जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सध्या जोरदार सुरू आहे. मात्र तळवडे कोंझरी कुंबळे या बागमंडला हरिहरेश्‍वर राज्यमार्गावरील मेन रोडला फोडून काही भागात साईड पट्टीचा देखील भाग खोदकाम करून राज्यमार्गाची दुर्दशा करण्यात आली आहे.

काही रस्त्यालगत असणार्‍या मोर्‍यांचा भाग देखील तोडून रस्त्यावर मातीचा ढीग रचून बाजूला न करता रस्त्याच्या अर्ध्या भागापर्यंत ही माती ठेवण्याचा प्रकार संबंधित ठेकेदार यांनी केलेला आहे. दुसरीकडे या राज्यमार्गाला साईडपट्टीचा जास्त भाग नसल्याने संबंधित ठेकेदार याने मूळ रस्त्यापासून अवघ्या सेंटीमीटर अंतरावर खोदकाम केलं असून आणखी हा राज्यमार्ग धोकादायक बनला आहे.

वेळी या मार्गावरून वाहन गेल्यास अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने प्रसंगी जीव गमवावे लागण्याची भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत, प्रशासनाने तत्काळ याबाबत दखल घेऊन या रोडची केलेली नासाडी संबंधित ठेकेदार यांकडून दुरुस्ती करून घ्यावी, अशी मागणी ये-जा करणार्‍या वाहनधारकांनी केलेली आहे. अन्यथा या मार्गावरून ये-जा करणार्‍या वाहनधारकांचा अपघात होऊन प्रसंगी जीव जाण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.

Exit mobile version