नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील 8 प्रमुख राजकीय पक्षांच्या 14 नेत्यांसोबत चर्चा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काश्मिरी नेत्यांची बैठक सुरु आहे.
या बैठकीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा केली जात आहे, हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. सर्वपक्षीय बैठकीत माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, महबूबा मुफ्ती आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित आहेत.
ही बैठक सुरू होण्याच्या 3 तासांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी पोहोचले. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये काश्मीरमधील नेत्यांसोबत होणार्या बैठकीच्या अजेंड्यावर चर्चा झाल्याचं बोललं जातंय. दुसरीकडे काश्मीरमधील नेत्यांसोबत भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षाच्या मुख्यालयात बैठक घेतली. या बैठकीत पक्षाचे नेते रविंद्र रैना, कविंद्र गुप्ता, निर्मल सिंह आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह उपस्थित होते.