| अलिबाग | प्रतिनिधी |
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे दि. 26 ते 29 ऑगस्ट 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या सी.बी.एस.ई. साऊथ झोन बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 या स्पर्धेत पी.एन.पी. होली चाईल्ड सी.बी.एस.ई. शाळेच्या इयत्ता नववीतील विद्यार्थिनी रिद्धी केतन पाटील हिने उल्लेखनीय कामगिरी करत 66 ते 70 किलो वजनगटात तृतीय क्रमांक पटकावत कांस्यपदक मिळविले.
रिद्धीने स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या स्पर्धेसाठी विद्यार्थिनीला शाळेचे पी.टी. शिक्षक आदित्य यादव यांनी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रिद्धीने सातत्यपूर्ण सराव व मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले. रिद्धीच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पी.एन.पी. एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच मुख्याध्यापिका एम. वेल्लैयम्माल व उपप्राचार्या सदाफ शहाबाजकर यांनी रिद्धीचे कौतुक करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.रिद्धीच्या या यशाबद्दल तिचे पालक, प्रशिक्षक, पी.टी. शिक्षक, शिक्षकवृंद आणि संपूर्ण शाळा समिती, परिवाराकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तिच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.






