। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील वरंध बौद्धवाडी येथील 11 म्हशींना विषबाधा होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राजपाल घागडे या तरुणाच्या मालकीच्या या म्हशी होत्या. राजपाल हे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांनी आपल्या गोठ्यात 18 ते 20 जातीवंत दुधाळ म्हशींचे संगोपन केले होते. या व्यवसायात गेली 40 वर्षांचा त्यांचा दांडगा अनुभव आहे.
दरम्यान, बुधवार, दि. 9 मार्च रोजी राजपाल घाडगे हे नेहमीप्रमाणे सकाळी पहाटे पाच वाजता दूध काढण्यासाठी गेले असता, प्रथमदर्शनी त्यांना दोन दुधाळ म्हशी मृतावस्थेत आढळल्या. हे दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी इतर जनावरांची पाहणी केली असता त्यातील पाच जनावरे तडफडत असून, मृत्यूशी झुंज देत असल्याचे दिसले. तात्काळ त्यांनी सदर घटना आपल्या घरातील माणसांना सांगितली. त्यानंतर दुर्दैवी घटना वरंध पंचक्रोशीत वार्यासारखी पसरली.
आमदार भरत गोगावले यांनी घटनास्थळी धाव घेऊन, संपूर्ण माहिती घेतली व संबंधित यंत्रणेला सद्यःस्थितीत मार्गदर्शक सूचना दिल्या. पशुवैद्यकीय दवाखाना ता. महाड आणि पंचायत समिती महाड पशुसंवर्धन विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे दृष्टीने उर्वरित जिवंत जनावरे वाचवण्यासाठी संपूर्ण दिवस शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. लोंढे आणि त्यांची टीम तसेच पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती महाडच्या डॉ. श्रीमती पडळकर आणि त्यांचे सहकारी हे उपस्थित होते. महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथील पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळ पंचनामा केला.
या मृत जनावरांचे रीतसर शवविच्छेदन करण्यात आले. तसेच उत्तरीय तपासणीसाठी महत्त्वाचे अवयव फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले आहेत. पुढील अहवाल आल्यानंतरच नेमका जनावरांचा मृत्यू कसा झाला, हे कळणार आहे. याप्रसंगी प्रामुख्याने अविनाश देशमुख, वसंत धनावडे, आशुराज देशमुख, संभाजी देशमुख, नागेश देशमुख, संजय देशमुख, सतीश देशमुख आणि सर्व पंचक्रोशीतील कार्येकर्ते यांनी दिवसभर मेहनत घेतली.