पोलादपूरकरांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा

राज पार्टे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय एकवटले
बदलीच्या प्रतीक्षेतील अभियंत्यांची शांतपणे उत्तरे

| पोलादपूर | प्रतिनिधी |

पोलादपूर महावितरण कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराला वाचा फोडण्यासाठी पोलादपूरकरांचा मोर्चा सोमवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना उपाध्यक्ष राज पार्टे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय विद्युत ग्राहकांच्या सहभागाने वाजत-गाजत महावितरण कार्यालय पोलादपूर येथे धडकला. पोलादपूर तालुक्यातील महावितरणच्या ग्राहकहिताविरोधी कारभारामुळे पीडित ग्राहकांच्या विविध समस्यांची जाणीव राज पार्टे व सहकार्‍यांनी महावितरणचे अभियंता सुनील सूद यांना करून देत खडसावले. मात्र, बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या या अभियंता सूद यांनी मुरलेल्या नोकरशहाप्रमाणे या मोर्चेकर्‍यांना सराईतपणे उडवाउडवीची उत्तरे शांत आवाजात दिल्याने आधीच्या आंदोलनाप्रमाणे हे आंदोलनही निष्फळ ठरेल की या मोर्चातून काही निष्पन्न होईल, या प्रतीक्षेत पोलादपूर तालुक्यातील विद्युत ग्राहक असल्याचे दिसून येत आहे.

पोलादपूर तालुक्यामध्ये विद्युत ग्राहकांच्या अनेक समस्या वाढीस लागल्या असून, यामध्ये प्रामुख्याने मीटर रिडिंग न घेता येणारे भरसमाठ लाईट बिल, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, जुने मीटर बदली करण्यात होणारी दिरंगाई, नवीन मीटरचे कनेक्शन देण्यासाठी होणारी दिरंगाई आदी अनेक प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे काम उपस्थितांनी केले. त्याचवेळी प्रीपेड मीटर बसेपर्यंत येणार्‍या तीन महिन्यांत लाईट बिल कमीत कमी यावे अन्यथा लाईट बिल भरण्यात येणार नाही, असा इशारादेखील राज पार्टे यांनी मोर्चेकर्‍यांच्यावतीने दिला.

याप्रसंगी मनसेचे पोलादपूर शहर अध्यक्ष दर्पण दरेकर, शेतकरी कामगार पक्षाचे बोरावळे सरपंच वैभव चांदे, मनविसेचे प्रवीण पांडे, ओंकार मोहिरे तसेच अन्य सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षाचे राजकीय पदाधिकारी तसेच ग्राहक मोर्चामध्ये सहभागी झाले होते. महावितरण अधिकारी सुनील सूद यांनीदेखील मोर्चेकर्‍यांच्या मागणीला दाद देत भेडसावणार्‍या समस्यांवर लवकरच तोडगा काढू तसेच नादुरुस्त मीटर बदलून तिथे येत्या चार ते पाच महिन्यांत प्रीपेड मीटर बसवू, असे प्रकारचे आश्‍वासन दिले.

यावेळी अभियंता सूद यांनी तालुक्यातील 20 टक्क्यांहून अधिक विद्युत मीटर नादुरूस्त असल्याची माहिती देऊन विद्युत ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याबद्दल खेद व्यक्त केला. अभियंता सूद यांनी या आधीच्या आंदोलकांसोबत ज्याप्रमाणे शांत चित्ताने उत्तरे देत आंदोलनाची वेळ टाळून नेली, तो आविर्भाव यावेळीही सूद यांनी दाखवून संयमाने मोर्चा संपण्याची वाट बघितली.
या मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलादपूर पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला.

Exit mobile version