मतपेट्यांच्या संरक्षणासाठी पोलीस प्रशासन ऑन ड्युटी

। रायगड । प्रतिनिधी ।

रायगड लोकसभा मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान होत असून यासाठी आवश्यक मतपेठ्या रवाना झाल्या आहेत. सात विधानसभाक्षेत्रांमध्ये मतपेट्यांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी खास स्ट्राँगरुम तयार करण्यात आले असून 24 तास पोलिस संरक्षणात इलेक्ट्रॉनिक मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. मतपेट्यांची सरमिसळ केल्यानंतर या मतपेट्या सबंधित विधानसभा मतदार संघात पंधरा दिवसांपूर्वीच पाठविण्यात आल्या. या मतपेट्या सर्व तांत्रिक चाचण्या पार करूनच पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.

पेण विधानसभा मतदार संघातील इलेक्ट्रॉनिक मतदान आणि व्हीव्हीपॅट यंत्र ठेवण्यासाठी कोकण एज्युकेशन सोसायटीच्या लिटील एन्जल स्कुलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.तर अलिबाग-मुरुड विधानसभा मतदार संघातील मतपेट्या जेएसएम महाविद्यालयातील जिमखान्यात ठेवण्यात आल्या आहेत. श्रीवर्धनमधील न्यू इंग्लिश स्कूल व म्हसळामधील ज्युनियर कॅलेज येथे स्ट्राँगरुम तयार करण्यात आली आहेत. महाड विधानसभा हद्दीतील मतपेट्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात ठेवण्यात आल्या आहेत. दापोली मतदार संघासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठातील सभागृहात व्यवस्था करण्यात आलेली आहे.

गुहागर मतदार संघातील मतपेट्या खेड येथील घरडा टेक्नॉलॉजी इमारतीमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. मतपेट्यांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र पोलिसांचा सशस्त्र पहारा देण्यात येत आहे. याची संपूर्ण जबाबदारी सबंधित प्रांताधिकार्‍यांकडे देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणुक विभागातून देण्यात आली.

Exit mobile version