संशयित बोट प्रकरणावर पोलिसांनी टाकला पडदा

| अलिबाग | प्रतिनिधी |

जिल्ह्यातील कोर्लई समुद्रात दिसलेली संशयास्पद बोट ही प्रत्यक्षात बोट नसून, ‌‘बोया’ असल्याचे ट्रान्सपोंडरद्वारे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी दिली. त्यामुळे गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या संशयित बोट प्रकरणावर रायगड पोलिसांनी पडदा टाकला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली होती. याबाबत कोणालाही माहिती देण्यात येत नव्हती विशेषतः प्रसार माध्यमांना यापासून दूर ठेवण्यात आले होते.

रविवार, दि. 6 जुलैच्या रात्री भारतीय तटरक्षक दलाला रायगड जिल्ह्यातील कोर्लई किल्ल्याजवळ एक संशयित बोट आढळल्याची माहिती मिळाली. Muqadar Boya 99 नावाची ही बोट MMSI-463800411 क्रमांकाची असून, ती पाकिस्तानातून आलेली असण्याची शक्यता वर्तवली गेली होती. तटरक्षक दल, नौदल व दिल्ली येथून मिळालेल्या माहितीच्या आधारे रायगड जिल्हा पोलीस दल सतर्क झाले. सदरची बोट अत्यंत संवेदनशील पद्धतीने कोस्टल अलर्ट अंतर्गत आढळल्यामुळे पोलीस दलाकडून तात्काळ तपास सुरू करण्यात आला. बोटीमध्ये कोणीही उपस्थित नव्हते, मात्र तिचा संशयास्पद स्वरूप व स्थळनिश्चितीमुळे अधिक तपासासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी, शासकीय यंत्रणा आणि गुप्तचर विभाग घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर पोलीस दलाने तटरक्षक दल, सीमा शुल्क विभाग, नौदल, मत्स्य व्यवसाय विभाग, मेरी टाईम बोर्ड यांनी जिल्ह्याच्या विविध भागात मोहीम हाती घेतली आहे. भारतीय तटरक्षक दलाकडील हेलिकॉप्टरद्वारे समुद्र किनाऱ्याची टेहळणी करण्यात येत आहे. रायगड पोलीस दलातील 52 अधिकारी विविध मोहिमेत सहभागी झालेत, असेही पत्रकात नमूद केले आहे.

जागता पहारा ठेवा
रायगड पोलिसांकडून सर्व सागर रक्षक दलांना रात्रीच्या वेळी समुद्रकिनारी गस्तीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्रकिनारी कोणतीही संशयास्पद बोट, व्यक्ती अथवा वस्तू मिळून आल्यास अथवा दिसून आल्यास, त्याचप्रमाणे कोणीही संशयित इसम आढळून आल्यास याबाबतची माहिती तात्काळ संबंधित 112, पोलीस निरीक्षक किशोर साळे 9284389289, पोलीस नाईक जयेश पाटील 9028276928, पोलीस शिपाई भरत जाधव 8208865077 यांना, तसेच संबंधित पोलीस ठाण्यास कळविण्याचे सांगण्यात आले आहे.
नागरिकांनी सतर्क राहावे
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील समुद्रकिनारी व जेट्टीवर असणाऱ्या बोटींची तपासणी पोलिसांकडून करण्यात येत आहे. यावेळी समुद्रकिनारी असणाऱ्या नागरिकांना सतर्क राहून आपल्या गावात व समुद्रकिनारी जर कोणी संशयित व्यक्ती अथवा बोट दिसून आल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी, असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.
काय आहे घटना?
अलिबाग तालुक्यातील थेरोंडा येथील जेट्टीवर ही संशयित बोट येऊन गेल्याचे जीपीएस यंत्रणेच्या सहाय्याने रविवार, दि. 6 जुलै रोजी रडारने शोधले होते. तेव्हा रविवारी दुपारी तीन वाजण्याचा सुमार होता. त्यानंतर केंद्रातील सुरक्षा यंत्रणांनी रायगड पोलीस प्रशासनाला कळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो संदेश पोहोचण्यास तब्बल सहा तास लागले. संदेश मिळाल्यानंतर रायगड पोलिसांनी सतर्क होत बंदोबस्त कडेकोट केला होता. रात्री दिसणाऱ्या प्रकाशापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न रायगड पोलिसांनी केला होता. परंतु, सोसाट्याचा वारा, पाऊस आणि अंधार यामुळे संशयित बोटीपर्यंत यंत्रणेला पोहोचता आले नाही, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
Exit mobile version