पोलीस मित्र संघटनेचे उपोषण सुरू

| कर्जत | प्रतिनिधी |

टोरेंट जल विद्युत प्रकल्पातील बेकायदेशीर वृक्षतोड, जमीन संपादन व वनकायदा उल्लंघन प्रकरणी पोलीस मित्र संघटनेकडून लोकमान्य टिळक चौकात बेमुदत साखळी उपोषण सोमवार दि.16 पासून सुरू करण्यात आले आहे. रविवारी रात्री वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी कदम यांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी टोरेंट प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी येत असल्याचे कारण पुढे करून कर्जत वन विभाग अधिकाऱ्यांनी एक खरी स्वाक्षरीचे व दुसरे बनावट स्वाक्षरीचे अशी दोन पत्रे प्रसिद्ध करून जनतेची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली. दोन्ही पत्रांची सखोल चौकशी करून बनावट पत्र प्रसिद्ध केल्याप्रकरणी संबंधित वन विभाग अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी. आदिवासी खातेदारांचा टोरंट प्रकल्पाला दळी जमीन देण्यास स्पष्ट विरोध असल्याचा ग्रामसभा ठराव मंजूर असताना, त्या ठरावाची प्रत जोडून जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस अधीक्षक, उपवनसंरक्षक यांना पत्रव्यवहार करण्यात आला होता. तरीही ठरावाला केराची टोपली दाखवून जमीन संपादन करून पेसा कायदा, वन हक्क कायदा 2006 आणि भूसंपादन कायदा 2013 चा भंग करण्यात आला. त्यामुळे ग्रामसभा ठरावाविरोधात केलेले संपादन तात्काळ रद्द करावे व संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. इत्यादी मागण्यांसह इतर मांगण्यांसाठी पोलीस मित्र संघटनेकडून बेमुदत साखळी उपोषण करण्यात आले आहे.

Exit mobile version