कार अपघातात पोलीस ठार

। पुणे । वृत्तसंस्था ।

पुण्यात रविवारी भीषण अपघात घडला आहे. एका भरधाव कारने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना उडवले असून या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे.

पुण्यातील हॅरिस ब्रीज बोपोडीजवळ रविवारी (दि. 07) रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. खडकी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून काम करणारे पोलीस हवालदार समाधान कोळी आणि पोलीस कर्मचारी संजोग शिंदे रात्रीची गस्त घालण्यासाठी दुचाकीवरुन निघाले होते. त्याचवेळी समोरून वेगाने येणाऱ्या अज्ञात कारने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये पोलीस हवालदार समाधान कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. तर, संजोग शिंदे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातानंतर आरोपी वाहनचालक आपल्या वाहनासह फरार झाला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून आरोपी वाहनचालकाचा शोध सुरू आहे.

Exit mobile version