पोलीस अंमलदार बेपत्ता

| पनवेल | वार्ताहर |

रबाळे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सोमनाथ फापाळे (31) असे या पोलीस शिपाईचे नाव असून, ते गेल्या 4 सप्टेंबर रोजी रात्रपाळी करून आपल्या घरी जातो, असे सांगून गेले होते. मात्र, ते घरी पोहोचलेच नाहीत. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात सोमनाथ फापाळे बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

सोमनाथ फापाळे हे कळंबोलीतील रोडपाली भागात पत्नी वैशाली हिच्यासोबत राहतात. तसेच ते सध्या रबाळे पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. 4 सप्टेंबर रोजी रात्री सोमनाथ हे वाशी येथे झोन वन स्ट्रायकिंगच्या गाडीवर कार्यरत होते. याबाबतची माहिती त्यांनी त्यांच्या पत्नीला कामावर जाण्यापूर्वी दिली होती. त्यानंतर मध्यरात्री वैशाली यांनी त्यांना फोनवर संपर्क साधला असता त्यांनी झोन वन स्ट्रायकिंगच्या गाडीवर वाशी येथे असल्याचे सांगितले होते. त्यानंतर वैशाली यांनी सोमनाथ यांना संपर्क साधला असता त्यांनी नंतर कॉल करतो, असे सांगून फोन कट केला होता. तर, पावणेआठ वाजता सोमनाथ यांनी पत्नीला संपर्क साधून थोडेसे टेंशन आले असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांचा फोन आल्याने वैशाली यांनी 9 वाजता त्यांना कॉल केला असता त्यांचा फोन बंद असल्याचे आढळले. दरम्यान, वैशाली यांनी सोमनाथ यांच्यासोबत असलेल्या पोलिसांचे नंबर मिळवून त्यांना संपर्क साधला असता सोमनाथ सकाळी 7.30 वाजताच घरी निघून गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर वैशाली यांनी इतर नातेवाईकांकडे सोमनाथ यांचा शोध घेतला, मात्र ते कुठेच मिळून आले नाहीत. त्यामुळे अखेर वैशाली यांनी 6 सप्टेंबर रोजी वाशी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. त्यानुसार, बेपत्ता पोलीस शिपाई सोमनाथ फापाळे यांचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

Exit mobile version