पोलीस पाटील मानधनापासून वंचित

एप्रिल 2022 पासून वेतन, तर 2012 पासून भत्तादेखील मिळाला नाही

| नेरळ | प्रतिनिधी |

सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं ब्रीद वाक्य असलेल्या पोलीस दलाला कायदा सुव्यवस्था सुस्थितीत राखण्यात खांद्याला खांदा लावून गावाखेड्यात काम करणारे पोलीस पाटील मानधनापासून वंचित आहे. आठ महिने उलटले तरी शासनाकडून त्यांना मिळणारे मानधन त्यांच्या बँक खात्यावर आलेले नाहीत. पोलीस पाटील संघटना याबाबत आमदारांना निवेदन देऊन पाठपुरावा करीत आहे.

गावखेड्यात छोटे-मोठे तंटे, हाणामार्‍या आणि इतर वादविवाद गावातच मिटवण्यासाठी पोलीस पाटील हे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्याचवेळी निवडणुकीच्या आणि सार्वजनिक मिरवणूक काळात पोलीस पाटील महत्त्वाची भूमिका शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी करीत असतात. त्या पोलीस पाटीलांना स्वतःच्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. कर्जत तालुक्यातील एप्रिल 2022 पासून वेतन, तर 2012 पासूनचे भत्तेदेखील पोलीस पाटलांना मिळालेले नाहीत. पोलीस पाटलांच्या या समस्या सोडविण्याकरिता महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघटना रायगड (कर्जत) यांच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आ. महेंद्र थोरवे यांची भेट घेऊन मानधनाचा आणि मासिक भत्ते शासनाने द्यावेत यासाठी निवेदन देण्यात आले.

अनेक वेळा पोलीस पाटील यांना आरोपी हजर करणे तसेच अन्य मिटींगसाठी पोलीस ठाण्यात हजर राहावे लागते. शासकीय दौरे आणि निवडणुका यामध्ये पोलीस पाटील यांची महत्त्वाची भूमिका असते. ग्रामीण भागात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करणार्‍या पोलीस पाटील यांना शासनाने एप्रिल 2022 पासून वेतन अदा केलेले नाही. तर, मागील दहा वर्षांत पोलीस पाटीलांची प्रवास भत्त्याची बिलेदेखील शासनाने अदा केलेली नाहीत. यासाठी येणार्‍या हिवाळी अधिवेशनात आपल्या प्रलंबित मागण्या यांचे निवेदन आ. महेंद्र थोरवे यांना कर्जत पोलीस पाटील संघटनेच्या वतीने देण्यात आले.

मानधन आणि इतर सोयी सुविधांपासून पोलीस पाटील आजतागायत उपेक्षितच आहे. म्हणून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आमदार थोरवे यांनी पोलीस पाटलांचे प्रतिनिधित्व करावे.

परशुराम सोनावळे
Exit mobile version