कामोठे पोलिसांचा हुक्का पार्लरवर छापा

चार महिलांसह 30 जण ताब्यात
पनवेल | वार्ताहर |
कामोठे सेक्टर-17 मधील ओम शिवम रेसिडेन्सी या इमारतीत बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर कामोठे पोलिसांनी रात्री छापा मारुन हुक्का ओढण्यासाठी बसलेल्या चार महिलांसह एकूण 30 जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य व तंबाखुजन्य पदार्थ जप्त केले आहे.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने रेस्टॉरंट, बार व इतर आस्थापना सुरु ठेवण्यासंदर्भात नियम व अटी लागू केलेले असताना सदरचे हुक्का पार्लर रात्री उशीरापर्यंत बिनदिक्कत सुरु ठेवण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरवाडे व त्यांच्या पथकाने कामोठे पोलिसांनी रात्री उशिरा या हुक्का पार्लरवर छापा मारला. पोलिसांनी सदर हुक्का पार्लरचा चालक लखन नरेश ठक्कर (25) व हुक्का पार्लरमध्ये काम करणारे पाच व्यक्ती, तसेच त्याठिकाणी हुक्का ओढण्यासाठी बसलेल्या चार महिलांसह एकूण 30 जणांवर कोरोनाच्या परिस्थितीत नियमांचे उल्लंघन करणे यासह विविध कलमांखाली गुन्हे दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version