अलिबागमध्ये उद्यापासून पोलीस भरती

272 पदांसाठी 19 हजार अर्ज
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया मंगळवारी (3 ते 22 जानेवारी) पर्यंत पोलीस मुख्यालय, रायगड-अलिबाग येथे सुरू असणार आहे. सदरची पोलीस भरती ही पोलीस शिपाई – 272 पदे व चालकपोलीस शिपाई – 06 पदे यांचेकरीता पार पडणार आहे. पोलीस शिपाई पदाकरीता पुरूष उमेदवारांचे 15949 व महिला उमेदवारांचे 3227 असे एकुण 19176 आवेदन अर्ज प्राप्त झालेले आहेत तर चालक पोलीस शिपाई या पदाकरीता पुरूष उमेदवारांचे 624 व महिला उमेदवांराचे 23 असे एकुण 647 आवेदन अर्ज प्राप्त झालेले आहेत. सदर पोलीस भरती बंदोबस्ताकरीता53 पोलीस अधिकारी,367 पोलीस अंमलदार व 27 मंत्रालयीन कर्मचारी असे मनुष्यबळ तैनात करण्यात आलेले आहे. सोमवारी (2 जानेवारी)पोलीस मुख्यालय, रायगड-अलिबाग येथे पोलीस भरती बंदोबस्ताची रंगीत तालीम पार पडली.

भरतीची वैशिष्ट्य
उमेदवारांची बायोमॅट्रिक पडताळणी, संपूर्ण मैदान सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीखाली, प्रत्येक इव्हेंटवर व्हिडीओ रेकोर्डिंग, प्रत्येक इव्हेंटसाठी अधिकारी इन्चार्ज, उमेदवारांची राहण्याची व्यवस्था.

सदरची पोलीस भरती प्रक्रिया ही निपक्षपातीपणे पार पडणार असुन कोणत्याही गैरप्रकाराला यामध्ये थारा असणार नाही. कोणत्याही व्यक्तीकडून ओळखीचे, आमिष दाखवून, पैशांची मागणी करीत असल्यास किंवा आर्थिक गैरव्यवहाराचा संशय आल्यास तात्काळ पोलीस अधिक्षक कार्यालय, दुरध्वनी क्रमांक या 02141-228473, 222028 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

पोलीस भरतीकरीता येणार्‍या उमेदवारांची रायगड जिल्हा पोलीस दलाकडुन क्षात्रैक्य समाज हॉल, कुरूळ,अलिबाग येथे निवासाची तात्पुरती व्यवस्था करण्यात आलेली आहे. भरती प्रक्रियेकरिता येणार्‍या सर्व उमेदवारांना रायगड पोलीस दलाकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. – जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक रायगड यांचे कार्यालय

Exit mobile version