गुन्हा दाखल करुन चौकशी करण्याचे निर्देश | मुंबई | प्रतिनिधी | बदलापूरमध्ये दोन लहान चिमुकल्यांवर अक्षय शिंदे या नराधमाने लैंगिक अत्याचार केला होता. तो अक्षय शिंदे पोलिसांच्या चकमकीत मारला गेला होता. ही चकमक खोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. अक्षय शिंदेने पोलिसांकडून बंदूक हिसकावून घेतली आणि गोळीबार केला, असा दावा पोलिसांनी केला होता. पण, या बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटाचे ठसेच आढळले नाहीत, असे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी पाच पोलिसांना दोषी ठरवण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
ठाणे दंडाधिकार्यांनी या संबंधीत अहवाल सादर केला होता. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे आणि नीला गोखले यांनी या अहवालाचे वाचन केले. बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. आरोपी अक्षय शिंदेला ठाण्यात आणताना अक्षय शिंदेने पोलिसांचे पिस्तूल हिसकावले, असा दावा पोलिसांनी केला. तसेच अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला, असेही पोलिसांनी सांगितले. आत्मसंरक्षणासाठी आम्ही अक्षय शिंदेवर गोळ्या झाडल्या, असे पोलिसांनी म्हटले. पण, जी पिस्तूल अक्षय शिंदेंने हिसकावली, त्यावर त्याचे बोटाचे ठसे नव्हते, असे फॉरेन्सिक चाचणीत निष्पन्न झाले आहे.
दुसरीकडे अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी ही चकमक खोटी असल्याचे म्हटले होते. अक्षयने पिस्तूल हिसकावली नाही, तो निःशस्त्र होता, त्याने पोलिसांवर हल्ला केलाच नाही असा दावाही अक्षयच्या कुटुंबीयांनी केला होता. जेव्हा ही चकमक झाली तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यंनी पोलिसांची बाजू घेतली होती. तसेच पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठीच गोळीबार केल्याचे म्हटले होते.
अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना घर आणि रोजगार द्या, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश आहेत. महत्त्वाचे म्हणजे, हा अहवाल सादर केल्यानंतर याप्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकार नेमकी काय कारवाई करते, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.