| अलिबाग | प्रतिनिधी |
महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हाशिवरे येथील दहावी 1997/98 व बारावी 1999/2000 च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी रविवारी (दि.19) रोजी बॅचचे “रौप्य महोत्सवी” वर्ष साजरे करण्यासाठी शाळेत ‘स्नेहमेळावा’आयोजित करुन शाळेतील आठवणींना उजाला दिला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्याला शिक्षण माजी शिक्षकांना आमंत्रित करून त्यांना सन्मानित करत त्यांनी केलेल्या सेवेचा आदर व्यक्त केला. विद्यार्थी आणि शिक्षक हे नात किती आदर्श असते हे शिक्षक आणि विद्यार्थी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. शाळा ही फक्त इमारत किंवा एक ठिकाण नसून ती अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारी एक सजीव संस्था आहे.
हा “स्नेहमेळावा” कुठेही बाहेर आयोजित न करता शाळेतच आयोजित करण्याचे सर्व विद्यार्थ्यांनी ठरविले. शाळेसोबत सामाजिक बांधिलकी जपत या बॅचमधील सर्व विद्यार्थ्यांनी निधी गोळा करुन शाळेला चांगल्या प्रतीची “साऊंड सिस्टीम” भेट म्हणून दिली. यामुळे शाळेत विद्यार्थ्यांसाठी जे कार्यक्रम सभागृहामध्ये आयोजित केले जातात त्यासाठी उपयोगात आणली जाईल. शाळेने यासाठी विद्यार्थ्यांचे आभार मानत सत्कार केला. विद्यार्थ्यांनी केवळ माजी शिक्षकच नव्हे तर शिक्षकेतर कर्मचारी आणि सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांचाही सन्मान केला.
याप्रसंगी महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. डी. गायकवाड, माजी शिक्षक अनंत देवघरकर, माधव जोशी सर, मदने सर, बसवनाथे मॅडम, कडवे सर, हाशिवरे हितवर्धक मंडळाचे सचिव ज्ञानेश्वर मोकल, सर्व माजी आणि आजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनात विशाल तांबोळी, निलम म्हात्रे, अर्चना ठाकूर, अभय ठाकूर, राकेश म्हात्रे, पंकज मोकल यांनी महत्वाची भूमिका बजावली.