| माणगाव | वार्ताहर |
माणगाव तालुक्यातील कडापे येथील श्री.बापूजी बुवा काळकाई देवस्थान येथे रविवारी (दि.19) सखी मंचने राज्यव्यापी महिला मेळाव्याचे आयोजन केले होते.
यावेळी कोकण विशानेमा ज्ञाती मंडळाचे अध्यक्ष प्रदीप गांधी यांनी मार्गदर्शन केले. या मंडळाचे विश्वस्त विजयशेट मेहता यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या मेळाव्याला राज्यभरातून आलेल्या हजारो महिलांनी प्रत्यक्ष उपस्थितीत राहुन तर 2 हजार पेक्षा अधिक महिलांनी ऑनलाइन द्वारे या मेळाव्याचा आनंद घेतला. या मेळाव्याचे उद्घाटन सखी मंचच्या अध्यक्षा उर्मिला गुजर यांच्या हस्ते करण्यात आले.
या महिला मेळाव्यात शैलजा आपटे यांनी दूध, मध, हळद, कॉफी, साखर आदी अन्नातील विविध पदार्थांतील भेसळ कशी ओळखायची, याबाबतचे प्रात्यक्षिक दाखवत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर प्रमुख मार्गदर्शक महिलांनी स्वतःसाठी दिवसभरात 15 मिनिटे तरी आपल्या स्वतः साठी राखून ठेवली पाहिजेत. त्यामुळे आपले शरीर स्वास्थ अधिक उत्तम राहील. महिलांनी स्वतःच्या पायावर अधिक सक्षम उभे राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षण, आरोग्यावर अधिक भर दिला पाहिजे. विशानेमा ज्ञाती सखी मंचने युट्यूब उपलब्ध करून दिले असून त्यातून तुम्हाला घर बसल्या माहिती आता मिळणार आहे. या युट्युबचा वापर जास्तीत जास्त महिलांनी केल्यास अधिक महिला सक्षम होतील, असा विश्वास ही त्यांनी दिला. महिलांनी स्वतःबरोबरच कुटुंब, समाज सुधरण्यासाठी वेळ दिला पाहिजे यासाठी सखी मंच आता यापुढे सतत प्रयत्न करीत राहील, त्याची सुरुवात माणगाव तालुक्यापासून करण्यात आल्याचे सांगून यापुढे सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
यावेळी प्रमुख पाहुण्या शैलजा आपटे, सामाजिक कार्यकर्त्या निकिता शेठ, जयश्री गुजर, भावना गांधी, महाड को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सदस्या नीता शेठ, नीलम मेथा, ज्योती खेमचंद मेहता, रंजना मेहता, नीलम मेहता, पूजा मेहता, जयश्री मेहता, सुनंदा शेठ, यासह मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सांगली, यासह राज्यभरातून आलेल्या अनेक महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
माणगाव