पोलीस ठाणे हद्दीचा फलक झुडपात

| नागोठणे | वार्ताहर |

डोलवी (ता.पेण) येथील जेएसडब्ल्यू स्टील लि. या कंपनीच्या सहकार्याने नागोठणे-रोहा मार्गावरील भिसे खिंडीत बसविण्यात आलेला पोलीस ठाणे हद्द सुरु झाल्याचा व हद्द समाप्तीचा व संबंधित पोलीस ठाण्याची दूरध्वनी, मोबाईल संपर्क क्रमांकाची माहिती दर्शविणारा फलक झुडपात हरविला आहे. त्यामुळे या फलकाभोवती वाढलेली झाडेझुडपे तोडून फलक दिसेल असा मोकळा करावा किंवा फलकाची जागा बदलून तो इतर ठिकाणी बसविण्याची गरज निर्माण झाली आहे.

डोलवी (ता.पेण) येथील जेएसडब्लू स्टील लि. या कंपनीच्या सीएसआर विभागामार्फत जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्याच्या इमारतीला नामफलक, बॅरिकेट्‌‍स, हद्दीचे फलक तसेच इतर अनेक आवश्यक ते फलक व साधने पुरविण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व नागोठणे-रोहा मार्गावर असलेल्या भिसे खिंडीच्या मध्यावर नागोठणे पोलीस ठाण्याची हद्द सुरू व समाप्त झाल्याचा तसेच रोहा पोलीस ठाण्याची हद्द सुरु व समाप्त झाल्याचा फलक जेएसडब्ल्यू कंपनीकडून लावण्यात आला आहे.

नागोठणे-रोहा मार्गावर भिसे खिंडीतील मध्यापासून एका बाजूला नागोठणे पोलीस ठाणे व दुसऱ्या बाजूला रोहा पोलीस ठाण्याची हद्द आहे. भिसे खिंडीतील याच मध्यावर उभारण्यात आलेल्या या फलकाच्या बाजूला झाडेझुडपे वाढल्याने हा फलक दिसत नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत या फलकाचा वाहक चालकांना व प्रवाशांना उपयोग होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे यावर जेएसडब्ल्यू प्रशासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही करुन आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

Exit mobile version