रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त

। खांदा कॉलनी । प्रतिनिधी ।

रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता पनवेल शहर पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गर्दीचा फायदा घेत चोरी, पाकीटमारी अथवा अन्य अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) शाकीर पटेल यांनी नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. बाजारपेठा, दुकाने, गर्दीची ठिकाणे आणि प्रमुख रस्त्यांवर पोलिसांची विशेष नजर असून, ठिकठिकाणी पायी गस्तही सुरू करण्यात आली आहे.

रक्षाबंधनानिमित्त बाहेर पडताना नागरिकांनी शक्यतो अनावश्यक मौल्यवान वस्तू, मोठ्या प्रमाणात रोख रक्कम अथवा महागडे दागिने सोबत बाळगू नयेत. विशेषतः महिलांनी गर्दीच्या ठिकाणी दागिने आणि पर्सची काळजी घ्यावी. वाहनांमध्ये मौल्यवान वस्तू ठेवून वाहन बेवारस सोडू नये, अशी सूचनाही पोलिसांकडून करण्यात आली आहे.

परिसरात संशयास्पद व्यक्ती, वाहन अथवा हालचाल आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून कारवाई न करता तातडीने पोलिसांना माहिती द्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच अनुचित प्रकार घडल्यास तो लपवून न ठेवता पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक (गुन्हे) शाकीर पटेल यांनी केले.

Exit mobile version