| कळंबोली | प्रतिनिधी |
तरुणाईला ड्रग्ज आणि विविध व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि एक निरोगी समाज निर्माण करण्यासाठी कळंबोली पोलीस ठाण्याच्यावतीने शनिवारी (दि.16) मे रोजी नशामुक्त शहर जनजागृती, मार्गदर्शन व समुपदेशन अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. कंळबोली सेक्टर-16 येथील रोडपाली बस डेपो येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात पोलीस अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी अमली पदार्थ विक्रेत्यांवर अत्यंत कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
या विशेष जनजागृती मोहिमेचे आयोजन कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते आणि अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांनी केले होते. या कार्यक्रमाला परिसरातील नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते. यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांनी, अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक शब्दांत प्रहार केला. “कळंबोली परिसरात कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांची विक्री किंवा वाहतूक खपवून घेतली जाणार नाही. ड्रग्ज पेडलर्सवर पोलीस प्रशासन अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करणार आहे,“ असा थेट इशारा त्यांनी दिला. तसेच, युवकांनी कोणत्याही छुप्या व्यसनाला बळी न पडता आपले भविष्य उज्ज्वल घडवण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही त्यांनी केले. आमदार विक्रांत पाटील यांनी देखील समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली.
पोलिसांचा ड्रग्स पेडलर्सना इशारा
