जिल्ह्यातील 37 हजार बालकांना पाजणार डोस
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवारी (दि.28) रायगड जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील एकूण 1 लाख 59 हजार 832 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. त्यानंतर पुढील पाच दिवस गृहभेटीतून मोहीम राबविली जाणार असून, 22 हजार 22 बालकांना लस पाजली जाणार आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये 1 लाख 82 हजार 854 बालकांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले. त्यापैकी 1 लाख 59 हजार 832 बालकांना लस देण्यात आले. त्यामध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत अपेक्षित 1 लाख 61 हजार 471 पैकी 1 लाख 43 हजार 924 बालकांना डोस पाजला. तसेच, जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत अपेक्षित 21 हजार 383 पैकी 15 हजार 908 बालकांना डोस दिला आहे. या मोहिमेसाठी जिल्हाभरात 2 हजार 341 लसीकरण बूथ उभारण्यात आले होते. 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला जवळच्या पल्स पोलिओ बूथवर डोस पाजण्यात आला. शहरी भागासह ग्रामीण भागात हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. एक दिवसाच्या यशस्वी मोहिमेनंतर शिल्लक असलेल्या बालकांना पोलिओ डोस पाजण्यासाठी पाच दिवस विशेष मोहीम राबविली जाणार आहे. कोणताही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका घरभेटी देऊन लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना लस देणार आहेत.
पुढील टप्प्यात आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका घरभेटी देऊन लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना लस देणार आहेत. स्थलांतरित कुटुंबे, बांधकाम कामगारांची वस्ती, वीटभट्ट्या, बसस्थानके, रेल्वे स्थानके तसेच दुर्गम भागांमध्ये विशेष पथकांद्वारे बालकांना पोलिओचे दोन थेंब दिले जाणार आहेत. 22 हजार 22 बालकांना डोस दिला जाणार आहे. पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजावेत आणि पोलिओमुक्त रायगड घडविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले.
